खटाव तालुक्यातील मायणी येथील दलीत समाजातील मयत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप करण्याचा प्रकार करणाऱ्या जयकुमार गोरे यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी काल वडूज शहरामध्ये जनता क्रांती दलाच्यावतीने जाहीर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जयकुमार गोरे यांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा दिल्या.
जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माजी जि.प. सदस्य दिलीप तुपे, गणेश भिसे, डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे संदिप ठोंबरे, विकास सकट, अनिल लोंढे, दत्ता केंगारे, गणेश इंगळे, अमोल दुबळे, चंद्रकांत अवघडे, मोहन अवघडे, आनंदा साठे, रोहिणी लोहार, महादेव पाटोळे, समाधान भिसे, सचिन पाटोळे (नाना), नितीन वायदंडे, बापूराव वाघमारे, सागर वायदंडे, सुमित शिंदे, विशाल लोखंडे, अजिंक्य वाघमारे आदी सहभागी झाले होते. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, मायणी येथील महादेव पिराजी भिसे हे मातंग समाजातील असून त्यांची वडीलार्जीत मिळकत गट आहे. त्याच्या लगत छत्रपती शिवाजी एज्युकेशन मायणी यांच्या तत्कालीन अध्यक्षांचा मालकी हक्क व कब्जे वहिवाटीची आहेत. या संस्थेचे जयकुमार गोरे हे अध्यक्ष असून संस्थेच्या मिळकतीत येण्या जाण्याकरीता सहाय्यक संचालक नगर रचना सातारा यांच्या कार्यालयात नकाशासाठी व भूसंपादनासाठी अर्ज सादर केला आहे.तसेच त्यावेळी तहसिलदार माने मॅडम माण यांचेकडे ११ डिसेंबर २०२० रोजी ॲफेडेव्हिट नं ४३००/ २०२० ने नोंदविले आहे.खटाव माण तालुक्याचे आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या ताकदीचा व पदाचा गैरवापर करून मयत पिराजी विष्णू भिसे यांच्या नावे अज्ञात व्यक्तीला उभे करून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करून जयकुमार गोरे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी संगनमताने महादेव भिसे व कुटूंबाची फसवणूक करून प्रतिज्ञापत्राचा खोटा मजकूर तयार करण्याचा प्रकार केला आहे. तसेच नगर रचना विभाग सातारा यांनाही खोटे ॲफेडेव्हिट देण्यात आले आहे.सदर व्यक्तीच्या ७/१२ उताऱ्यास बेकायदेशीररित्या फेरफार बदल करण्याचा प्रकार जयकुमार गोरे यांनी केला आहे. याशिवाय गोरे यांनी भिसे कुटूंबियांच्या राहत्या घरावरही घाव घातला असून ही राहती घरे पाडण्यासंदर्भात डाव आखला आहे. गोरे यांनी केलेला हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे.न्यायव्यवस्था सर्वांना समान असताना सर्वसामान्य लोकांना पोलीस प्रशासनाकडून तातडीने अटक केली जाते, मात्र जयकुमार गोरे ला अटक केली जात नाही. जयकुमार गोरे यांच्या कृतीस माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते फडणवीस, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. तसेच गोरे यांची इडी मार्फत चौकशी करण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा : आ. जयकुमार गोरे यांनी केलेल्या खटाव माण तालुक्यातील मातंग समाजात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याला तातडीने अटक करावी अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी जनता क्रांती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांनी सांगितले.