महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. ३ मे : शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी शिवरायांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत. महाराजांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार आणि रणनीती प्रेरणादायी आहे. शिवरायांनी आपल्या अप्रतिम शौर्यानं आणि युद्ध कौशल्यानं भारताची राष्ट्र भावना चेतवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते, असे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले. पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन महेता ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य वाळवेकर यांच्या शुभहस्ते युगपुरुष श्री. छ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.