बुलंद बुरुजासारखी माणसे हीच शिवरायांची प्रेरणा:डॉ. अमर अडके
पाटण प्रतिनिधी: केवळ लढाया किंवा गडकिल्ले एवढेच शिवशाहीतील सुवर्णक्षण नव्हेत तर छातीचा कोट करणारी बुरुजासारखी बुलंद ,स्वामिनिष्ठ माणसे शिवरायांनी निर्माण केली. ध्येयवादी जीवाला जीव देणारे वीर उभे केले. अशा वीरांच्या कथांमधून अनेक सुवर्णक्षण आपणास पाहता येतील असे प्रतिपादन कोल्हापूरचे व्याख्याते डॉ. अमर अडके यांनी केले .अध्यक्षस्थानी अमरसिंह पाटणकर होते. येथील स्वातंत्र्य सेनानी व्यंकटेश अंताजी तथा मालक देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पहिलेच व्याख्यान पुष्प ” मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण ” डॉ. अडके यांनी गुंफले. प्रारंभी कै. मालक देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर ए. व्ही. देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ऍड. सौरभ देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय इंगवले यांनी प्रास्ताविक केले. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद करावेत नि कोणत्याही परिस्थितीत सूर्योदयापर्यंत उघडू नयेत या शिव आज्ञेचे पालन करणारे कर्तव्यनिष्ठ किल्लेदार , आग्र्याला जाताना केवळ आठ वर्षांच्या बाळ संभाजी राजांना आभाळाएवढे मोठे व्हा असा उपदेश करतानाच दुसरीकडे कातर झालेला शिवरायांमधला पिता, औरंगजेबाच्या दरबारातील शिवरायांचे बाणेदार वर्तन असे काही भावपूर्ण क्षण आपल्या शैलीदार भाषणात श्रोत्यांपुढे उभे करून डॉ. अडके म्हणाले की पुराव्याशिवाय बोलणार नाही , इतिहासामधला भूगोल पाहिल्याशिवाय लिहिणार नाही व ऐकीव दंतकथांना इतिहासलेखनात स्थान देणार नाही असा इतिहासकारांचा बाणा हवा. श्री. अमरसिंह पाटणकर म्हणाले की कै. मालक देशपांडे यांना मी प्रत्यक्ष पाहिले होते. काही प्रसंगी संवाद केलेला होता. स्वातंत्र्य चळवळीत मालक देशपांडे , बुवा म्हावशीकर व त्यावेळचे त्यांचे सहकारी यांचे कार्य नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने देशपांडे मंडळींनी आयोजित केलेले प्रदर्शन व व्याख्यान हे उपक्रम महत्वाचे आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील तालुका — स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने मालक देशपांडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ऍड. सौरभ देशपांडे यांनी संयोजित केलेल्या ” स्वातंत्र्य संग्रामातील पाटण तालुका ” या देशभक्तांची छायाचित्रे, माहिती, ताम्रपट, व सन्मानपत्र , पुस्तके व पत्रे ठळक घडामोडी यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन पाटण नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपनगराध्यक्ष सागर पोतदार, अरविंद घाडगे यांची समयोचित भाषणे झाली. आपण आपला इतिहास जतन करण्यात कमी पडतो. आज स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांकडे ऐतिहासिक दस्तऐवज पुस्तके पत्रे इ. वस्तू फार क्वचित मिळतात. असे सांगून विक्रमबाबा पाटणकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एच.व्ही. देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सर्वश्री विजयराव शेंडे ( ग्रंथ लेखक ) , अरुण खांडके ( कला शिक्षक ) मनोहरपंत फाटक ( वृत्तपत्र विक्रेते व माजी सैनिक ) संजय इंगवले ( ग्रंथपाल व नगरसेवक ) राजेश पोतदार (चित्रकार ) आणि पाटण मध्ये स्वखर्चाने दरवर्षी साहित्यसंमेलन करणारे विक्रमबाबा पाटणकर यांचे सत्कार मालक देशपांडे प्रतिष्ठानतर्फे ग्रंथभेट आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. सौ. निशा आणि सौ. कविता फाटक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गौरीश देशपांडे यांनी आभार मानले मेघा शिंदे हिने पसायदान सादर केले. कार्यक्रमास डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भोसले सर, मैत्रेय प्रतिष्ठानचे उदय कुलकर्णी व बबन जाधव , जानुगडेवाडीचे प्रसाद जानुगडे , नगर वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार निकम , नगरसेवक जगदीश शेंडे व स्वप्नील माने, प्राचार्य डॉ. शिरीष पवार, प्रा. विलास पवार, प्रा. डी.डी. थोरात, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंतराव पाटील पापर्डेकर , विलासराव क्षीरसागर , दीपकसिंह पाटणकर तसेच महिलावर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.