महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने दिनांक २५ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये कृषि संजीवनी मोहीम संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे दि. २७ जून रोजी चव्हाण वस्ती येथे कृषि संजीवनी कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस म्हणून साजरा केला गेला. या कार्यक्रमामध्ये ऊस पिकावरील महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषि पर्यवेक्षक प्रविण माने यांनी माती परिक्षण, प्रातिनिधिक माती नमुना घेणे, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांच्या शिफारशी काढणे या बाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर ऊस पिकासाठी जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांच्या शिफारशी काढण्याचे तंत्रज्ञान सांगण्यात आले. वाणेवाडी परीसरामध्ये सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्याअनुषंगाने सोयाबीन पिक तंत्रज्ञान, सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रीया या विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

तसेच जमिनीची जलधारण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यावेळी उपस्थित महिलांना पोषणयुक्त संरक्षित अन्न योजने अंतर्गत भाजीपाला बियाण्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्तावीक कृषि सेविका पी.एस.मदने यांनी केले, तर सुरेखा भोसले यांनी आभार मानले.






















