फलटण तालुक्यातील प्रकार उघडकीस ;पुरवठा शाखेकडून माहिती देण्यास नकार.
फलटण प्रतिनिधी:- सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ वाटपाची घोषणा केली. मात्र ‘आनंदाचा शिधा’ सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी ‘आनंदाचा शिधा’ पाकिटातून साखर गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे याबाबत पुरवठा विभाग यांच्याकडुन कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्यात आल्याने महसुल विभागावर शंका उपस्थित होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप केला जातोय. मात्र अनेक ठिकाणी यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहेत. सद्या अनेक ठिकाणी रवा, तेल आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून, साखर मात्र गायब आहे. फलटण तालुक्यासह अनेक ठिकाणी देखील साखर तर काही ठिकाणी तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांना डाळ रवा आणि तेल द्यावे लागत आहे, साखर देत नसतानाही यासाठी 100 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 35 ते 40 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून साखर विकत घ्यावी लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाचा शिधा 140 रुपयांना पडत आहे.
नागरिकांना वाटपासाठी आलेल्या ‘आनंदाचा शिधा’च्या कीटमध्ये तीनच पदार्थ आले असून, साखर गायब आहे. त्यामुळे रेशन दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक साखरबाबत विचारत आहे. पण वरूनच साखर आली नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजवून सांगताना दुकानदारांची दमछाक होत आहे. तर अनेक ठिकाणी तुम्हीच साखर वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आधीच कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहेत. त्यामुळे अशात सरकारने घोषणा केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाच्या निर्णमुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ 100 एवेजी 140 रुपयांना पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आनंदाचा शिधा मधील साखर गेली कुठे असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. १०० रुपयात रवा, साखर, पामतेल, चना डाळ रेशनकार्ड धारकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक दुकानात साखर पोहचली नसल्याने ही साखर नेमकी गायब झाली कुठे ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना गायब झालेली साखर कधी मिळणार का असा सवाल उपस्थित हाेत आहे. सध्या दिली जात नसणारी साखर गेली कुठे ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार की काय अशी चर्चा आहे.
रेशनिग दुकानाची चौकशीची मागणी
फलटण तालुक्यात ज्या रेशनिंग दुकानांमधून साखर वगळून आनंदाचा शिधा दिला जात आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप न करता कागदावर नावे लिहून वाटप करत असल्याने तसेच आनंदाच्या शिदेची पूर्ण रक्कम घेत असल्याने फक्त काहीच ठिकाणी साखर का वगळून मिळत आहे असा सवाल नागरिक करत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.






















