खा. रणजीतसिंह यांच्या कर्तबगारीचे गडकरींकडून कौतुक……
फलटण प्रतिनिधी:- आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग हा येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केलेला फलटण शहरामधून जाणारा जो पालखी मार्ग आहे; तो मी पूर्ण करून देत आहे यासोबतच फलटणला असणाऱ्या विमानतळावरील असणाऱ्या मार्गाचे काम सुद्धा मी करून देतो याकरिता त्याबाबत आवश्यक ते असणाऱ्या गोष्टी जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देऊन मार्गी लावून द्यावेत असे मा. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गा मंत्रालय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने उंडवडी कडेपठार- बारामती फलटण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० चे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करणे ( लांबी : ३३.६५ कि.मी. प्रकल्पाची किंमत रु. ७७८ कोटी) व शिंदेवाडी- भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी.डी. चे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करणे (लांबी : ५६.४५३ कि.मी. किंमत रु. ७२३ कोटी) या मार्गाचा भूमीपूजन व कोनशिला अनावरण समारंभ तसेच लोणंद-सातारा रस्ता रा.म.क्र. ९६५ डी चे मजबुतीकरण करणे (लांबी ४६.७९५ कि.मी. किंमत रु.३८ कोटी) या मार्गाचा लोकार्पण समारंभ फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता.यावेळी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी बोलत होते.
खासदार रणजितसिंह हिंदूरावजी नाईक निंबाळकर,खासदार श्रीनिवास पाटील ,आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, मा.विरोधी पक्ष नेते फ.न फ समशेरसिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर ,आमदार दीपक चव्हाण जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, डॉ दिलीप येळगावकर, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीसह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते .
उंडवडी कडेपठार ते बारामती – फलटण रस्ता संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल व रोजगारनिर्मिती होईल. कृषी व औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल. परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. वेळेची व इंधनाची बचत होऊन सुरक्षित वाहतूक करणे शक्य होईल. शिंदेवाडी फाटा ते भोर – वरंधा घाट रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पावसाळ्यात वरंधा घाटामध्ये ४ महिने बंद राहणारा रस्ता वर्षभर सुरू राहील. राजगड किल्ला, निरा देवघर धरण व भाटघर धरण या निसर्गरम्य पर्यटनस्थळांचा विकास होईल व पर्यटनाला चालना मिळेल. भोर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल तसेच इंधन व वेळेची बचत होईल. सदर प्रकल्पांमुळे उत्तर महाराष्ट्र कर्नाटकशी जोडला जाईल. फलटण व एकूणच सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर भर दिला जाईल व शाश्वत विकासाची गती वाढेल, पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रांताशी जोडला जाईल तसेच मासेमारी व साखर उद्योगासाठी वाहतूक सोयीची होईल.
फलटण तालुक्यातील वारक-र्यांनी जे माझे स्वागत केले आहे; त्यामुळे मी नतमस्तक होवून वंदन करतो.आज फलटणमध्ये मी दुसऱ्यांदा आलो आहे मला फलटणमध्ये येण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. ह्या ऐतिहासिक फलटण शहरामध्ये येऊन आपल्याला भेटायला मिळालं ते मोठं भाग्य आहे. विठोबा, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी एक आपल्यावर प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे संतांच्या बाबत आपल्या मनामध्ये एक वेगळे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजयांच्या मुळेच आज आम्ही आहे. राजा कसा असावा; तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखाच असावा. त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही फलटणची भूमी आहे. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाचे काम करण्याचे श्रेय हे माझे नाही तर ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांनी हे माझ्या माध्यमातून हे काम करून घेतलं आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मुंबई ते बेंगलोर व नागपूर ते बंगलोर हे दोन महामार्ग फलटणमधून जात आहेत. पिंपरी चिंचवड व पुणे येथे पालखी मार्गासाठी डबल डेकर ब्रिज आपण बांधत आहोत, नाईकबोम वाडी ते महामार्गाचे फलटणला असणाऱ्या विमानतळावरील असणाऱ्या मार्गाचे काम सुद्धा मी करून देतो फक्त त्याबाबत आवश्यक ते असणाऱ्या गोष्टी जिल्हाधिकारी यांनी मार्गी लावून द्यावेत, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फलटणमध्ये एवढी मोठी भव्य दिव्य सभा ही नितीन गडकरी यांची होत आहे. एकदा शब्द दिला की, तो पूर्ण करण्याचे काम हे नितीन गडकरी करीत असतात. नितीन गडकरी यांच्याकडे कामासाठी गेल्यावर त्याच्या फॉलोअपसाठी पुन्हा जावे लागत नाही. संबंध राज्यातील वारकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा ह्या नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांना कळली होती. पालखी महामार्ग फाईल ही पूर्वी प्रलंबित होती; त्यासाठी गडकरी साहेबांकडे गेलो होतो त्यांनी तातडीने सांगितले की खासदार ही फाईल पूर्ण होईल. फलटण शहरांमधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचे सुद्धा प्रलंबित काम आपण करावे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्या विमानतळावर आपण उतरलो त्या ठिकाणीची हवाई मार्ग दुरुस्त करावा. फलटण तालुक्यातील शेरेचेवाडी व सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करावा. पालखी महामार्गामुळे अर्धा रिंग रोड झाला आहे; त्याला पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड करावा, अशी मागणी आज फलटणकरांसाठी करत आहे. मी खासदार झाल्यानंतर जनतेची कामे कोणी केलं असेल तर गडकरी साहेब यांच्या मुळे झालं आहे. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होत; मला शांत करून त्यांनी फलटणला कार्यक्रम करण्याचा शब्द मला गडकरी साहेबांनी दिला.विकासकामांचा डोंगर उभा राहत असताना आम्हाला ह्या डोळ्यांनी बघायला मिळणार आहे,असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
फलटण ह्या ऐतिहासिक नगरमध्ये आपले प्रथमच आगमन झाले असेल. प्रमोद महाजन हे फलटणमध्ये येऊन गेल्याचे आठवत आहे. शहाजी बापू माझी भीती तुम्हाला वाटते हेच एकदम ओके आहे. आपण मूळ कोणत्या पक्षाचे आहोत आपण आधी अपक्ष आहोत. मग काँगेस मग मी पुढं काही सांगणार नाही. गडकरी साहेब मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं आहे त्याबद्दल आभार. 1995 साली गडकरी साहेब जेंव्हा मी माझे काम घेऊन गडकरीसाहेबांकडे गेलो होतो; तेंव्हाच त्यांनी मला सांगितलं होत की आता माझ्याकडे फॉलोअप घेण्याची आवश्यकता नाही. आज सुद्धा दिल्लीमध्ये आपण गेलो तरी गडकरी साहेब ते काम मार्गी लावतात. फलटण तालुक्यातून जे दोन महामार्ग मंजूर करून पुढे गेले आहेत हेच महत्वाचे काम गडकरी साहेब आपण केले आहे. आमच्या घराने विकासाचे राजकारण आम्हाला शिकवलं आहे. विधानसभेत गडकरी साहेबाना प्रश्न विचारायचा असेल तेंव्हा मला पोटात गोळा येत होता. आपण आज जे पुण्यातून चार तासात मुंबईला पोहचत आहोत ते फक्त गडकरी साहेब यांच्यामुळेच शक्य झाले आहे. आज जो फलटण तालुक्यातून ग्रीन
हायवे चालला आहे; ते अतिशय गरजेच्या वेळी तुम्ही करत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व
पक्षीय लोकप्रतिनिधींशी बैठक आपण दिल्ली, मुंबई किंवा कुठेही घ्यावी, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे नितीन गडकरी जे काम करीत आहेत ते बघितलं की मला शरद पवार साहेबांची
आठवण येते. शरद पवार साहेब जेंव्हा दिल्ली येथे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या प्रकारे काम करत असतात त्याच प्रमाणे नितीन गडकरी हे काम करीत आहेत. आज एक संपूर्ण सातारा जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला जिव्हाळा वाटावा असा कार्यक्रम फलटणमध्ये होत आहे. सातारा जिल्ह्याचे महत्व इतिहासात आहे. सातारा जिल्ह्यासोबत फलटणचे सुद्धा महत्व इतिहासात आहे. देशामधील रस्त्यांचे जे मोठे काम करत आहेत; त्यांच्यामुळेच भारतमातेला मजबूत करण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत. नितीन गडकरी यांनी राज्यातील संबंध वारकऱ्यांचा मोठा प्रश्न सोडवला आहे. पालखी मार्ग करून वारकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न नितीन गडकरी यांनी सोडवला आहे. जसा राजा राजवड्याकडे जातो तसा वारकरी आता पंढरीकडे जाणार आहे. फलटण शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचा प्रश्न सुद्धा गडकरी साहेब आपण मार्गी लावावा, अशी मागणी आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
फलटण येथील विमानतळावर ना. नितीन गडकरी यांचे आगमन झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील , समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कुलच्या प्राणगांपर्यंत ना. नितीन गडकरी यांचे भव्य दिव्य स्वागत करत रॅली काढण्यात आली. यामध्ये हत्ती, घोडे, उंट यासह झांजपथक व गजी नृत्य ना.नितीन गडकरी यांची मिरवणूक काढण्यात आली. उंडवडी कडेपठार – बारामती – फलटण रस्ता चौपदरीकरण व काँक्रीटीकरण, शिंदेवाडी –भोर – वरंधाघाट रस्त्याचे भूमिपूजन व लोणंद-सातारा रस्ता या मार्गाचे लोकार्पण ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.






















