नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार देशातील 12 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात बेरोजगार झाले आहेत. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 1.9 कोटी आहे. केवळ जुलै महिन्यात 50 लाख लोकं बेरोजगार झाले आहेत. अशावेळी फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या ज्यांची नोकरी गेली आहे, सरकारकडून त्यांना खुशखबरी मिळत आहे.
केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी (Industrial workers) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत (Atal Beemit Vyakti Kalyan Yojana) दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाने कोरोना व्हायरस संकटकाळात ईएसआईसी (Employees’ State Insurance Scheme- ESIC)मध्ये रजिस्टर्ड नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला यावर्षी 24 ते 31 डिसेंबरपर्यंत बेरोजगारी बेनिफिट (Unemployment Benefit) देत दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत आता तीन महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 42 लाख कामगारांना फायदा होणार आहे.
(एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता)
24 मार्च ते 31 डिसेंबर दरम्यान नोकरी गेलेल्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या प्रस्तावाला एम्प्लॉयी स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशन (ESIC) बोर्डाने मंजुरी दिली होती, ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) करत होते. त्यांनी अशी माहिती दिली होती की, बेरोजगारी लाभासाठी ESIC अंतर्गत करण्यात आलेले क्लेम्स 15 दिवसात पूर्ण केले जातील. याआधी 25 टक्के रक्कम दिली जात होती. हे कर्मचारी आता त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम भत्त्यासाठी क्लेम करू शकतात. अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना ESIC द्वारे संचालित आहे.
या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी, मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार
केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरी गेल्याच्या तारखेनंतर 30 दिवसानंतर या रकमेसाठी क्लेम करता येईल. पहिल्यांदा हा कालावधी 90 दिवस होता. त्याचप्रमाणे आता याकरता क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीकडे जाण्याची गरज नाही. बैठकीच्या अजेंडानुसार, क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि शाखा स्तरावरच त्याचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल. यानंतर थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात क्लेमची रक्कम पाठवण्यात येईल.