चाफळ : प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले तसेच डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांसाठी वरदान म्हणून मुख्य बाजारपेठ लाभलेल्या चाफळ ला ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा वारसा असताना आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले दिसत आहे.पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी प्राथमिक आरोग्य केंद्रासह अनेक उपकेंद्र हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विभागात सात उपकेंद्र कार्यरत आहेत.तर चाफळ येथे जागा उपलब्ध नसल्याने येथील उपकेंद्र गत वर्षापासून बंद पडलेले आहे. परिणामी येथील रुग्णांना एक कि.मी पायपीट करत उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे.तर नानेगाव बुद्रुक (कडववाडी) येथेही उपकेंद्रास इमारत नसल्याने कर्मचाऱ्यांना खाजगी पडवीचा आधार घ्यावा लागत आहे. संपूर्ण चाफळ विभागाचा विचार केल्यास विभागात एकूण २२ गावांसह ५० वाड्या वस्त्यांचा समावेश आहे.याकरीता पाच कर्मचारयांची नियुक्ती केली असून या पाच कर्मचाऱ्यांमध्ये तीन आरोग्य सेवकांचा तर दोन आरोग्य सेविकांचा समावेश आहे. यातील पाडोळीशी , नानेगाव बुद्रुक , चाफळ , दाढोली , उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवकांची कमतरता आहे. सध्या विभागात कार्यरत असणाऱ्या तीन आरोग्य सेवक व दोन आरोग्य सेविकांवर सात उपकेंद्रांचा भार सोपवला गेल्याने त्यांनाही सेवा देताना दमछाक होत आहे. तसेच चाफळ विभागातील बरीचशी गावे ही डोंगर पठारावर वसलेली असल्याने प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.