19 महागड्या सायकलींची चोरी करणारे चोरटे गजाआड
नागठाणे /प्रतिनिधी
बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून महागडया सायकली चोरून साथीदारांमार्फत विकणाऱ्या एका अल्पवयीन संशयितासह तीन आरोपींना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून ३ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ रोजी रात्री ९ चे सुमारास राजेंद्र जगन्नाथ घोरपडे (रा. खोजेवाडी ता. सातारा) यांच्या राहत्या घराच्या पार्किंग मधून एक १२ हजार रूपये किंमतीची सायकल चोरीस गेली होती. याबाबतची तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल होती. या चोरीच्या अनुशंगाने पोलीस ठाण्याची डी. बी. टीम संशयित चोरट्याच्या मागावर होती.
दरम्यान गोपनीय बातमीवरून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास केला असता अजुन दोघे संशयित निष्पन्न झाले. महागडया सायकली चोरणारा एका अल्पवयीन मुलासह प्रकाश धनाजी जाधव (वय ५० रा. अपशिंगे (मि)), भंगार व्यावसायिक नासिर खालिद खान (वय ३८, रा. वर्णे ता. सातारा) या तिघा संशयितांना जेरबंद केले.
संशयिताकडे अधिक तपास करून सातारा शहर, सांगली, कोल्हापूर येथून एकुण १९ महागडया सायकली व गुन्ह्यात वापरलेला अॅपे रिक्षा टेंपो असा एकुण २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अमोल गवळी, अमोल सपकाळ, दादा स्वामी, सुनिल कर्णे, प्रशांत चव्हाण, काॅ. विशाल जाधव, केतन जाधव यांनी केली आहे.
ज्यांच्या सायकल चोरीस गेल्या होत्या त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा
बोरगाव पोलिस ठाणे परिसर तसेच इतर ठिकाणांवरून चोरीस गेलेल्या या सायकली आमच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. ज्या कुणाच्या सायकली यात असतील त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. व ओळख पटवुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही पुर्ण करून आपापल्या सायकली घेऊन जाव्यात
सपोनि रविंद्र तेलतुंबडे (प्रभारी बोरगाव पोलिस ठाणे