ललित पाटील ड्रग्स प्रकरणी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांची मागणी
सातारा : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्रातील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात मोतलिंग यांनी असे म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील ड्रग्स बनवण्याचा कारखाना ललित पाटील याच्या मार्फत चालवला जात होता. तसेच महाराष्ट्रातील ड्रग्स चे रॅकेट मोठ्या प्रमाणात ललित पाटील व इतर सहकार्यांच्या मदतीने चालवले जात होते. या राज्यातील पिढी बरबाद करण्याचा घाट त्यांनी घातलेला होता. या प्रकरणात ललित पाटील ला अटक करण्यात आलेली होती. परंतु आजारी असल्याचे कारण देत गेली वर्षभर ससून हॉस्पिटल मध्ये तो राहत असल्याचे दाखवून हॉटेल मध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे की, असा कोणता आजार होता की ललित पाटील ला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. हे शंभूराज देसाई यांनी उघड करावे व आजपर्यंत ललित पाटील ड्रग्स प्रकरणात काय चौकशी केली आहे, याचा खुलासा मंत्री देसाई यांनी आजपर्यंत केलेला नाही.
संभाजीनगरमधील ज्या कंपनीने राज्याचे 143 कोटींचे महसूल बुडवले, त्या कंपनीची सुनावणी मंत्र्याच्या दालनात बोलावली होती. त्याचे काय कारण होते? पुण्याचे एक्साईजचे अधिकारी चरणसिंग राजपूत यांनी बंद केलेली ताडी पुन्हा सुरू केली. तसे का करण्यात आले? याच राजपूतने अनेक दुकानदार मोफत दारू प्यायला देत नाहीत म्हणून मारहाण केली आहे, त्याचा इतका लाड का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
सातारा जिल्ह्यात गांजा मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होत आहे, अशी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे व यामध्ये तरुण पिढी अक्षरशः नशेपायी बरबाद होत आहे. या सर्व गोष्टींची पालक मंत्र्यांना माहिती नाही का? माहिती असेल तर कारवाई का होत नाही? राज्यात व सातारा जिल्ह्यात चाललेल्या ड्रग्स गैरकारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.