कोट्यवधी रुपयांच्या निधीस ‘खो’ ; घनकचऱ्याच्या टेंडरसह अनेकस महत्वाच्या विषयांना नामंजूरी
दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या निर्णयामुळे दहिवडीकरांची सध्या चांगलीच गैरसोय होऊ लागली आहे. घनकचऱ्याच्या टेंडरसह अनेक विषय स्थायी समितीने नामंजूर केल्याने दहिवडीतील नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने लोकांमधून नगरपंचायतीच्या कामाबाबत आणि स्थायी समितीच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या स्थायी समितीमध्ये उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती राजेंद्र साळुंखे, नगरसेविका मोनिका गुंडगे, सुप्रिया जाधव यांनी विविध विषय नामंजूर केले, तर मंजुरीच्या बाजूने नीलम जाधव यांनी आपले मत नोंदवले.
गेल्या आठ दिवसापासून दहिवडी नगरपंचायत हद्दीतील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वाहनाद्वारे घनकचरा डेपोवर टाकणे, गटारी साफ करणे, इत्यादी कामांच्या प्राप्त निविदांपैकी कमी दराच्या निविदांना मंजुरी देणे अपेक्षित असताना त्यात स्थायी समितीने नामंजुरी दिल्याने कचरा नेमका कुठे टाकायचा ?असा प्रश्न दहिवडीकरांसमोर उपस्थित उभा राहिला आहे. या प्रश्नासह
स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२४च्या रंगरंगोटीच्या कामाच्या निविदेच्या कामास नामंजुरी, साफसफाई कामगार नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रशिक्षण आणि सुरक्षेच्या आवश्यक बाबीच्या खरेदीवरील निविदेस नामंजूरी, सामुदायिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीच्या आर्थिक प्रशासकीय मान्यतेस नामंजुरी , प्रभाग क्रमांक १३ मधील दहिवडी सातारा मेन रोड ते साधना अकॅडमी पर्यंत डांबरीकरण करणे या कामास नामंजुरी ,अशा एकूण १५ कामांबाबत स्थायी समितीने हरकत घेत हे विषय नामंजूर केले. एकूण १६ विषयांपैकी पाणी ट्रॅक्टर टँकरवर मनुष्यबळ सेवा पुरवणे या फक्त एकाच विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. एकूण १६ विषयांपैकी १५ विषय नामंजूर झाल्याने सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या कामास ‘खो’ बसला आहे.
यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत दहिवडी नगरपंचायतीस प्राप्त झालेला साडेचार कोटी रुपयांचा पुरस्कार फक्त नावालाच का? स्थायी समितीने नामंजूर केलेल्या विषयांमुळे दहिवडीकरांची होत असलेली गैरसोयीची कोंडी कशी फोडली जाणार? या एकंदरीत प्रकाराबाबत नगरपंचायत प्रशासन कोणता निर्णय घेणार ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्थायी समितीच्या विरोधात नगराध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे..?
स्थायी समितीने नामंजूर केलेल्या अनेक विषयांच्या कामाबाबत नगराध्यक्ष सागर पोळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ३०८ प्रमाणे आपला तक्रारी अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती सागर पोळ यांनी दिली.
राष्ट्रवादीकडूनच राष्ट्रवादीवर कुरघोडी?
या एकंदरीत प्रकारानुसार राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांवर कुरघोडी केल्यानेच सागर पोळ यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी जावे लागले, तर भाजपाच्या पुरस्कृत नगरसेविका नीलिमा जाधव यांनी आपले मत मंजुरीच्या बाजूने नोंदवत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सागर पोळ यांना साथ दिल्याची चर्चा दहिवडीत रंगली आहे.