महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा : शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या करंजे ता. सातारा येथील महानुभाव आश्रमाचे संचालक, सातारा जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष पंथभुषण, आचार्य प्रवर महंत श्री. सातारकर बाबा (वय ९४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
१० नोव्हेंबर १९२६ रोजी मुंबई – पार्ले येथे त्यांचा जन्म झाला. पार्ले टिळक विद्यालयात जुनी अकरावी पर्यंत शिक्षण झाले. जेष्ठ साहित्यीक पु.ल. देशपांडे यांचे ते वर्ग मित्र होते. १९४५ मध्ये ते सातारा येथील महानुभाव पंथाच्या आश्रमात वास्तव्यासाठी आले. त्यानंतर आश्रमाचे संस्थापक कै. आचार्य मोतीवाले बाबा यांच्या हस्ते त्यांनी पंथाच्या संन्यास धर्मात प्रवेश केला. तर कवीश्वर, कुलाचार्य मुरलीधर कारंजेकर ( अमरावती ) यांच्या कडून ब्रम्हविद्येचे अध्ययन केले. दरम्यान त्यांना आश्रमाच्या ट्रस्ट च्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. महंत धर्मराजदादा बिडकर म्हणून ते महानुभाव पंथात प्रसिद्ध होते.
त्यानंतर १९९७ मध्ये येथील आश्रमाच्या मुख्य संचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आखिल भारतीय संत संमेलनाचे त्यांनी चार वेळा कुशल व्यवस्थापन केले होते. सर्व संन्यस्त विद्यार्थ्यांना त्यांनी ब्रम्हविद्येचे धडे तर सदभक्तांना प्रवचन ज्ञानदान करुन पंथाचा प्रचार व प्रसार केला. २००७ मध्ये सातारा जिल्हा महानुभाव परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील सुमारे ३५० संन्यस्त साधक, अभ्यागतांची व्यवस्था केली जात होती. त्यांच्या कारकिर्दीत आश्रमातील निवासाकरिता बांधकामे,महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्रांचा जिर्णोद्धार तसेच मुंबई, नाशिक, पाटण, कांगवाई, सांगली, हातवे येथील पंथाच्या शाखांचे कार्य पुर्णत्वाकडे गेले. २०१२ मध्ये येथील आश्रमाचा शताब्दी महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. २३ वर्षाच्या महंत पदाच्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र, दिल्ली सह इतर राज्यात पंचवीस हजार पेक्षा अधिक अनुयायी वर्ग निर्माण केला. त्यांच्या निधनाने महानुभाव पंथामध्ये शोककळा पसरली