सातारा/ प्रतिनिधी : रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांची आष्टेडू मर्दाना आखाडा असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा सागर दादांच्या आजवरच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील उज्वल कामगिरीचा सार्थ गौरव आहे, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांकडून व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकीतून सागरदादांच्या सुरू असलेल्या घोडदौडीला महाराष्ट्र राज्य आष्टेडू आखाड्याच्या राज्य कार्याध्यक्षपदी मिळालेला सन्मान संबंधित क्रीडा संघटनेला मिळालेले योग्य नेतृत्व आणि उज्वल वाटचालीचे प्रतीक आहे, तसेच सागरदादांच्या समाजसेवी नेतृत्वाला क्रीडा क्षेत्राचे नवे आकाश खुले झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आष्टेडू आखाड्याच्या राष्ट्रीय स्तरावरील महाचॅम्पियनशिपचा सामना नुकताच साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून आष्टडू आखाडा खेळाडू आले होते. सातारा -जावली विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि शिवछत्रपतींचे वंशज आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन व साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष जयेंद्रदादा चव्हाण, आष्टेडू आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश तलमारे, रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संपूर्ण देशभरातून आलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येऊन सागरदादांची आखाडा असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
वास्तविक सागरदादा पवार हे नेतृत्व म्हणजे कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या छोट्याशा गावातून उदयास आलेले कष्टाळू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी अभ्यासातील हुशारीच्या बरोबरीने नेतृत्वगुण जपले आहेत. महाविद्यालयीन जीवनात कला, क्रीडा व अभ्यासामध्ये असलेल्या प्रगतीच्या जीवावर त्यांनी विद्यार्थ्यांचे नेते म्हणूनही प्रसिद्धी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर इतरत्र नोकरी करण्याऐवजी इतरांना रोजगार देण्याची आणि उद्योजक म्हणून इतर अनेकांसाठी आधारवड ठरण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवाह जवळ केला. या राजकीय संघटनेत जिल्हा सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. ग्रामीण भागातून येऊन उल्लेखनीय समाजसेवा करणाऱ्या या नेतृत्वाचा आलेख खोडण्याचा प्रयत्न काहींनी केला मात्र त्यांना धडा शिकवून आपल्या कार्याची झळाळी सर्वदूर नेण्याचे कार्य सागरदादांनी केले आहे. स्वतः उभारलेल्या संघटनेद्वारे समाजकार्यात सक्रिय राहण्यासाठी त्यांनी रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतलेली भरारी खऱ्या अर्थाने भल्याभल्यांना धडकी भरवणारी आहे. म्हणूनच क्रीडा क्षेत्रातील देशपातळीवर नावाजलेल्या आष्टेडू आखाडा असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. चॅम्पियनशिप आखाड्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही त्यांच्या भाषणात सागरदादांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांना उज्वल भवितव्य असल्याचे भाकीत व्यक्त केले. शिवछत्रपतींच्या घराण्यातील नेतृत्वाने सागरदादांना दिलेल्या शुभेच्छा आगामी काळातील बदलत्या व सकारात्मक राजकीय संकेतांचे सूतोवाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दरम्यान या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष जयेंद्रदादा चव्हाण यांनीही सागरदादांच्या उज्वल प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व आपणही मूळचे कोरेगाव तालुक्याचेच राहिवासी असून कोरेगावने संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक हिरे दिलेले आहेत, अशी आठवण करून दिली. विविध क्षेत्रातील जाणत्या व्यक्तिमत्त्वांनी सागरदादा पवार यांना दिलेल्या शुभेच्छा सार्थ ठरतील, यात शंकाच नाही. आष्टेडू आखाड्याच्या निमित्ताने सागरदादा पवार यांची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल खऱ्या अर्थाने उज्वल ठरावी, याच सदिच्छा