दहिवडी : ता.१०
मार्डी येथील रहिवासी व सदाशिवराव पोळ वि.का.से.सोसायटी लि. मार्डीच्या विद्यमान संचालिका वर्षा पोळ या आपल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे पत्र त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांना लिहिले आहे.
वर्षा पोळ यांनी सोसायटीच्या कर्जाची परतफेड करताना त्यांच्यावर दबाव टाकला जात असून शासननिर्णयानुसार कर्जवसुलीसाठी स्थगिती असताना सोसायटी आणि बँकेच्या मार्फत त्यांना तगादा लावला जात असल्याकारणे त्यांनी ३०/११/२०२३रोजी तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी शिंगाडे यांच्यासह दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि यांनी वर्षा पोळ यांच्या राहत्या घरी जात त्यांची समजूत घालत सविस्तर चर्चा करत चौकशी करून वर्षा पोळ यांना १०/०१/२०२४रोजी सविस्तर लेखी अहवाल देऊ असे सांगितले. यावेळी बँकेच्या माध्यमातून लेखीही देण्यात आल्याने ०१/०१/२०२४रोजी करण्यात येणारे आत्मदहन आंदोलन स्थगित केल्याचे पत्रात म्हटले आहे. याबाबत त्यांनी त्यावेळी बॅंकेस आणि दहिवडी पोलीस ठाण्यास कळवल्याचे म्हटले आहे.
यानंतर १०/०१/२०२४रोजी बँकेने दिलेल्या अहवालाने माझे समाधान झाले नसून ११/०१/२०२४रोजी माझ्या राहत्या घरी मार्डी येथे मी आत्मदहन करत असल्याचे सांगत माझी जीवन संपवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार व दहिवडीचे सपोनि यांना हे पत्र मेल केले आहे असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.






















