युरियाची चढ्या दराने विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक
दहिवडी : ता.२५
माण तालुक्यातील दहिवडी येथील मे. वाघोजीराव पिलाजीराव पोळ झुआरी डिलर नावाच्या दुकानात खत विक्रीचा मोठा घोळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे दुकान सुनील पोळ यांचे असून या दुकानामध्ये नियमित दरापेक्षा एका युरियाच्या पोत्यामागे ३५रुपये अधिक घेतले जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर एक युरियाचे पोते घ्यायचे असल्यास दुकानात युरियाच शिल्लक नसल्याचे सांगून युरिया घ्यायचा असेल तर त्याबरोबर कोणतेही एक शेतीसाठी लागणारे औषध घ्यावे,अशी सक्ती केली जात आहे.
त्यामुळे पोळ यांच्या दुकानातून शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
हा प्रकार जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू आहे. याकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यानेच हे दुकानदार अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करताहेत.
पोळ यांच्या दहिवडीतील दुकानाबरोबर माण तालुक्यातील जवळपास सर्वच खतांच्या दुकानातही सर्रास अशाच प्रकारे खतविक्री सुरू असून शेतकरी खतविक्री दुकानदारांच्या या मनमानीला अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांना याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत एकप्रकारे खतविक्री दुकानदारांचीच पाठराखण केली जात असल्याचा आरोपही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे.अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही.
चौकट :-
दुकानदारांच्या आर्थिक नफ्यातून कृषी अधिकऱ्यांचे भले?
एका युरियाच्या पोत्यामागे केली जाणारी ही औषध खरेदीची सक्ती आणि त्यातून दुकानदारांना मिळणारा नफा होत आहे. नियमित दराप्रमाणे २६५/२६६ रुपये एवढा विक्रीदर आहे. मात्र एका पोत्यामागे ३५ रुपये एवढा नफा हे दुकानदार कमवत आहेत. त्यातूनच कृषी अधिकाऱ्यांचे भले होत असल्याची चर्चा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
प्रतिक्रिया :-
माण तालुक्यात सध्या सर्वत्रच अशी परिस्थिती आहे. खतविक्री करणाऱ्या दुकानदारांकडून सध्या होत असलेल्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे. त्यांना लगाम घालण्यात तालुका कृषी अधिकारी हे अपयशी ठरलेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल.
—–राजू मुळीक, माण तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.