दहिवडी : ता.०८
दहिवडीतील मुख्य चौक असणाऱ्या फलटण चौकात दहिवडी नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्याक्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी एक खड्डा खणला आहे. त्या खड्ड्यातील निघालेल्या मुरुमाचा ढीग हा अद्यापपर्यंत गेले आठ दिवस झाले तसाच पडून आहे. या काळात ना पाईपलाईन दुरुस्ती झाली ना रस्त्यावरील मुरूमाचा ढीग बाजूला झाला. महत्वाची बाब म्हणजे हा खड्डा खणताना नगरपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. यामुळे ‘काय सांगू बाबा मला हे कसंच पटेना..! दहिवडी नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला फलटण चौकातला खड्डा दिसेना.!!’ अशा फिल्मी आणि गाण्याच्या यमकात्मक ढंगीने दहिवडीकर आणि प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
दहिवडीतील फलटण चौक हा नेहमीच वाहतूक आणि वर्दळ असणारा चौक आहे. या चौकातून फलटणकडून, वडुज, कराड, सातारा, सांगलीकडे तर साताराकडून गोंदवले मार्गे म्हसवड तसेच दहिवडी मार्गे अकलूज आणि फलटणकडे जाणाऱ्या वाहनांची मोठा राबता असतो. अशा या चौकात नगरपंचायतीने मला मोठा खड्डा खणून त्याचा मुरूम रस्त्याच्या मध्यभागी टाकला आहे. त्यातच भर म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर पावसामुळे पाण्याचे तळे साचले जात आहे. या बाबीकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करून चालढकलपणा करत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यातच ही बाब लक्षात आणून दिली गेली होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे दिसत आहे.
रस्त्यावर साचलेले पाणी आणि नगरपंचायतीने खड्डा करून रस्त्यावर टाकलेला मुरूम यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपंचायतीने परवानगी न घेताच खणलेल्या या खड्ड्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत प्रशासनावर कारवाईचा बडगा उभारणार का? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील साचणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून मुरूम टाकला जाणार का? नगरपंचायतीने पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या आठवड्यापासून खड्डा करून रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाची विल्हेवाट लावून रस्ता मोकळा होणार का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
चौकट :
फलटण चौकातल्या रस्त्यावर खड्ड्यातील मुरमाचा भार! वरून पावसाची तर खालून रस्त्याकडेला साचलेल्या पाण्याची वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर उडणारी गढूळ धार… ही परिस्थिती बदलण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.