सातारा : कुशी तालुका सातारा येथील बहुचर्चित यशराज प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निषेधार्थ रयत क्रांती संघटनेने वारंवार निवेदने आणि प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर नुकताच सोमवारी दिनांक 12 रोजी प्रभारी प्रदूषण महामंडळ अधिकारी सातारा यांनी यशराज येथील प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी सादर केलेल्या पाहणी अहवालामध्ये यशराज येथून इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात यशराज प्रकल्प स्थलांतरित करण्यात यावा अथवा त्याला टाळे ठोकण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटना पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
दरम्यान मागील आठवड्यात रयत क्रांती संघटनेने यशराज इथेनॉल प्रकल्पात होत असलेल्या प्रदूषणाच्या विरोधात आणि गावकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचे विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. तत्पूर्वी वारंवार प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिली होती. परंतु तत्कालीन प्रदूषण महामंडळाचे अधिकारी यशराज प्रकल्पाच्या प्रदूषणाला पाठीशी घालत होते. त्यानंतर प्रदूषण महामंडळाचे अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती समोर येण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान प्रभारी प्रदूषण महामंडळ अधिकारी यांनी संघटनेला आठ दिवसाची मुदत मागत संघटना आणि प्रशासन एकत्र यशराज येथील प्रकल्पाची पाहणी करेल व त्यानंतर त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करेल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवार दिनांक 12जून रोजी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र संबंधित यशराज येथील प्रकल्पाची पाहणी केली. आणि त्यानंतर प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणाची माहिती पाहणी अहवालामध्ये प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नोंद केलेली आहे. एकूणच एका बाजूला प्रचंड मोठ्यात प्रदूषण करायचे आणि दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मिती केल्याचे भास्वयाचे. मात्र खऱ्या अर्थाने कंपनीच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे कोट्यावधी रुपयांची पिकांची नुकसान होत आहे हे आज प्रदूषण महामंडळाचे अधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यशराज इथेनॉल प्रकल्प सुरू ठेवायचा नाही तो येत्या आठ दिवसात बंदच झाला पाहिजे अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिलेला आहे.
































