जखिणवाडी आगाशिव बौद्ध लेणी कराड येथील विद्रुपीकरण थांबवावे आणि लेण्यांचे संवर्धन व्हावे. राहुल कांबळे
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : जखिणवाडी कराड आगाशिव बौद्ध लेणी सहल बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून शनिवारी दिनांक 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या धम्म सहलीमध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यासक, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.यावेळी आयोजित कार्यशाळेमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.राहुल कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले “महाराष्ट्रामध्ये ज्या लेण्या आहेत त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लेण्या आहेत. या लेण्या वाचवण्यासाठी या ठिकाणी होत असलेले विद्रुपीकरण थांबवावे आणि लेण्यांचे संवर्धन व्हावे ही बौद्ध विरासत वाचवली जावी यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ही संघटना कार्य करत आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने लक्ष घालून येथील बौद्ध लेण्यांचे विद्रूपीकरण थांबवावे अन्यथा या विरुद्ध बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क सर्व बौद्ध, बहुजन बांधवांना घेऊन संघटित लढा करणार असे विचार मांडले.” तसेच पुरातत्त्व लेणी अभ्यासक मा.अशोक नगारे उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपस्थितांना लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून सांगितले.
यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष मा.किशोर थोरवडे साहेब यांनी जखिणवाडी कराड आगाशिव बौद्ध लेणी सहल बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून लेण्यांचे संवर्धन आणि सर्व सोयी सुविधा युक्त पर्यटन स्थळ पूर्ण होईपर्यंत धम्म सहल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष व विचार संवर्धन समितीचे मा.टी.एस. कांबळे यांनी मार्गदर्शन केले.ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सातारा जिल्हा अध्यक्ष मा.किशोर थोरवडे साहेब मा.विनोद लादे जिल्हा सचिव सातारा ,मा. कैलास कांबळे बौध्दाचार्य कराड, मा.बाळासाहेब कांबळे,मा. सुनील वाघमारे, मा. संजय आढाव शिराळा, मा. अर्जुन कांबळे हातकणंगले यांनी परिश्रम घेतले.