फलटण पोलिसांनी केली अटक : न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालकांवर बेछूट आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या दिगंबर आगवणे यास स्वराज्य नागरी पतसंस्थेकडून दाखल असलेल्या फसवणुकीच्या तक्रारप्रकरणी अटक केली आहे. आगवणे यास फलटण न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती फलटण पोलिसांनी दिली असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बदनामी करणारच अखेर तुरुंगात जावून बसल्याची प्रतिक्रिया फलटण तालुक्यातून व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून दिगंबर आगवणे याने एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज घेताना आगवणे याने तारण दिलेली मिळकत वादातील होती. याप्रकरणी फलटण उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या अर्धन्यायिक प्रक्रियेत स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेनेही सहभाग घेतला होता. यावेळी आगवणे तारण दिलेली जमीन किंमती असल्याचे भासवून पतसंस्थेबरोबरा गहाणखत केले असल्याचे समोर आले होते. ही पतसंस्थेची फसवणूक असल्याने तसेच कर्जवसुलीसाठी पतसंस्थेचे अधिकारी गेल्यानंतर त्यांना तसेच सर्व संचालकांवर ॲट्रॉसिटीची केस घालण्याची धमकी आगवणे देत होता.
यावर पतसंस्थेच्यावतीने कलम 156 अन्वये न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला होता व न्यायालयाने पोलिसांना याबाबत तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेेशही दिले होते. त्यानुसार पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यांनी 11 मार्च 2022 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आगवणे याच्यावर कायदेशीर कारवाई होणार होती. मात्र, आगवणे याने सातारा येथील कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. या अटकपूर्व जामिनाची मुदत दि. 25 जुलैपर्यंतच होती.
सोमवारी ही अटकपूर्व जामिनाची मुदत संपली असल्याने फलटण ग्रामीण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी आगवणे याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दि. 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, आगवणे याला अटक केल्याची चर्चा फलटण तालुक्यात जोरदारपणे सुरु असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर राजकीय कारणातून खोटे आरोप करणारा व त्यांची बदनामी करणाराच गजाआड झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पोलिसांना दंडेली केल्यामुळे पोलिसांनी दिला प्रसाद
दिगंबर आगवणे याने घेतलेल्या अटकपूर्व जामिनाची मुदत दि. 25 रोजी संपली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरुच होती. मात्र, आगवणे निवांत होता. सोमवारी फलटण ग्रामीण पोलीस अटक करण्यास गेल्यानंतर मग आगवणे याचे धाबे दणाणले. त्यावेळी मग कारवाई टाळण्यासाठी आगवणे याने पोलिसांशी दंडेली करण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांना पोलीस खाक्या दाखवण्याची वेळ आली. पोलिसी खाक्या दाखवूनच आगवणे यास ताब्यात घेवून पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. या दरम्यान, मग आगवणे याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाला होता.
आरोप करणाराच झाला गजाआड
‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे करत याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिगंबर आगवणे याने करत खळबळ उडवून दिली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत खासदार निंबाळकर यांना क्लिनचिट मिळाली असून आता खुद्द आरोप करणाराच गजाआड झाल्याची प्रतिक्रिया फलटण तालुक्यातून व्यक्त होत होती.
tamjai nagar