अलिबाग, ९ जून : जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, वीजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर वीजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व कोरोना संदर्भातील उपाययोजनासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र,) सर्जेराव मस्के पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर.एस.मोरे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग माकीलाल तपासे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ.बी.के.आर्ले, मत्स्य व्यवसाय अधिकारी अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान वीजेच्या खांबांचे झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वीजेचे खांब पडले आहेत तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसात पूर्ण एसटी लाईनचे काम पूर्ण करावे. या कामासाठी बाहेरुन जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल, त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जेणेकरुन काम करताना कुठली कमतरता पडू नये. परंतु एकदंरित परिस्थिती पाहता सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ आहे.
कोरोनामुळे बाहेरचे मजूर यायला घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, नागरिकांनी एकजूटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे, असे सांगून श्री. तनपुरे पुढे म्हणाले, ज्या व्यक्तींच्या घरांची पडझड झाली आहे, झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.