महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
दहिवडी, : माण-खटावच्या सुपुत्रांनी राज्यसेवा परीक्षेत मिळविलेले यश अभिनंदनीय आहे. एक उत्तम अधिकारी म्हणून नावलौकिक होण्यासाठी तुम्ही जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे आपल्या उत्कृष्ठ कामगिरीने माण-खटावचा वेगळा ठसा उमटवा असे प्रतिपादन माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून स्पर्धा परीक्षेमधील माण-खटावच्या यशाची परंपरा यावर्षीही चालू ठेवल्याबद्दल यशस्वी सुपुत्रांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
आज लोधवडे (ता. माण) येथे आयोजित या समारंभाप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, उपसभापती तानाजी कट्टे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबूराव काटकर, बाळासाहेब माने, बबनराव विरकर, अनुराधा देशमुख, बाजार समितीचे संचालक तानाजी मगर, अंगराज कट्टे, माजी सरपंच अमोल काटकर, बाळासाहेब पोळ, राजूभाई मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री देशमुख म्हणाले की माणचे सुपुत्र गुलाबराव पोळ यांनी सुरु केलेली स्पर्धा परीक्षेतील यशाची ही परंपरा अविरत सुरु आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे येवून जिद्द, चिकाटी व कष्टाने आपली मुलांनी यश मिळवले आहे. या यशाने हुरळून न जाता आपल्या पदाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा. सामान्य जनतेचे, कष्टकर्यांचे प्रश्न सोडविता आले तरच आपल्याला अधिकारी म्हणून घेण्याचा हक्क आहे.
प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की दहिवडी काॅलेज दहिवडी मध्ये अतिशय उत्तम स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा. या केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात माणमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील अशी आम्हाला खात्री आहे.
श्रीराम पाटील म्हणाले की प्रशासकीय अधिकारी म्हणून वाटचाल करताना परत वळून मागे पहावे. आपल्या गावाचा, परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. राज्यसेवेपुरते मर्यादित न राहता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुध्दा यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
अनुराधा देशमुख म्हणाल्या की नवीन नियुक्ती झालेल्या अधिकार्यांनी आपल्या आई-वडील, नातेवाईक, आपलं गाव व मार्गदर्शक यांच्या कष्टांची जाण ठेवावी व नेहमी त्यांचा आदर करावा.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे व चैतन्य कदम, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक अश्विनीकुमार माने, तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी राजेश कदम, नायब तहसीलदार प्रगती कट्टे, कक्ष अधिकारी गौरी कट्टे यांचा निवडीबद्दल व नायब तहसीलदार अभयकुमार साबळे यांच्या निवडीबद्दल त्यांच्या पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तींनी आपल्या अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास उपस्थितांना सांगितला.