पाटण : पाटण अर्बन बँकेने सुरू केलेले एटीएम हे ग्राहकांना निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करावी लागणार नाही. एटीएमच्या माध्यमातून त्यांना तात्काळ पैसे मिळणार असल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे. पाटण अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एटीएमच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्राहकांचे हित जपण्याची बँकेने परंपरा कायम ठेवली असून सभासद व ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
दि पाटण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन महोत्सवानिमित्त पाटण शाखेत बसविण्यात आलेल्या एटीएमचा शुभारंभ माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती रेखाताई पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाषराव पवार, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री पाटणकर पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील बहुतांशी लोक पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी कामानिमित्त आहेत. अनेक सभासद व ग्राहकांची पाटण अर्बन बँकेत खाती आहेत. त्यामुळे या ग्राहकांना त्या त्याठिकाणी पैसे काढण्यासाठी हे एटीएम कार्ड नक्कीच उपयोगी ठरणार आहे. सभासद, ग्राहक, ठेवीदार यांनी या एटीएम सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा. पाटण अर्बन बँक नेहमी आपल्या सेवेशी तत्पर राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण अर्बन बँक सर्वसामान्य जनतेसाठी विविध सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. पाटण अर्बन बँकेचा शाखाविस्तार झाला असला तरी बँकेची अद्यापपर्यंत एटीएम सुविधा नव्हती. दादांच्या संकल्पनेतून ग्राहकांच्यासाठी एटीएम सुविधा मूर्त स्वरूपात साकार झाली आहे. जिल्ह्यातील 200 कोटींच्या आतील ठेवी असणाऱ्या बँकांपैकी पाटणसारख्या ग्रामीण भागात एटीएम सुरू करण्याचा पहिला मान पाटण अर्बन बँकेला मिळाला आहे. पाटण अर्बन बँकेशी संलग्न असणाऱ्या ग्राहकांना एटीएमची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्राहकांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कुठेही पैसे काढणे सुलभ होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कपिलेश्वर यांनी एटीएमसंदर्भातील माहिती दिली. बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे यांनी स्वागत केले. व्हाईस चेअरमन शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक के. आर. शिंदे यांनी आभार मानले. दिलीपराव मोटे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास नथुराम झोरे, जयसिंग राजे महाडिक, रामचंद्र पानस्कर, विठ्ठलराव जाधव, वंदना सावंत, कविता हिरवे व ग्राहक, सभासद उपस्थित होते.