महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
१५ जुलै पर्यंत आणखी ६१ विमानांनी येणार प्रवासी
मुंबई, : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १८७ विमानांनी २८ हजार ९१६ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ४४८ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९८६३ आहे तर इतर राज्यातील ८६०५ प्रवासी ही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत.राज्यात १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ६१ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना कॉरंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
विविध देशातून आलेले प्रवासी
विविध देशांमधून आलेल्या प्रवाशांमध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान,ओमान, दक्षिणअफ्रिका,इंडोनेशिया,नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार,हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम,
इटली, स्विडन, इथोपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी,न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन या देशांचा समावेश आहे.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.