महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा जिल्हय़ात कोरोनाचे थैमान सुरूच असून बाधितांचे रोज नवे उच्चांकी आकडे येत आहेत. शुक्रवारी रात्री 669 इतके पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ाची चिंता वाढली आहे. त्यातच 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 332 नागरिकांना दहा दिवसांनंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्हय़ाची वाढ चिंताजनक असून पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 22 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आजच्या 669 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये 339 जण ऍन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ाची स्थिती गंभीर होत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हय़ाला भेट देऊन आढावा घेतला.
* जिल्हय़ाची स्थिती गंभीर-फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना सातारा येथे जिल्हा रूग्णालय व कराड येथील कृष्णा रूग्णालयात भेट देऊन पाहणी केली. जिल्हय़ाची कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे साताऱयात तातडीने जम्बो कोविड हॉस्पिटल उभारावे. कराड हे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे शासनाने कराडकडेही जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्हय़ाचा बाधितांची टक्केवारी 18.50 टक्के होती. ती गेल्या आठवडय़ात 22 टक्क्यांपर्यंत गेल्याने ती राज्यापेक्षा जास्त आहे. जिल्हय़ात चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, कोविड सेंटरला भेट दिली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यावेळी उपस्थित होते. या संवादातील मुख्य बिंदू असे:
– सातारा जिल्ह्याचा संसर्ग दर वाढला आहे.
कृष्णा हॉस्पीटलला भेट दिली. येथे 1400 रूग्णांवर उपचार करून ते बरे झाले. हजारावर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कराड हे सध्या जिल्ह्याचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे पुढच्या काळात येथे अधिक लक्ष द्यावे लागेल.
– या काळात राज्य सरकारच्या वतीने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
राज्य सरकार म्हणते की, महात्मा फुले जनारोग्य योजनेत सर्व रूग्णांना मदत दिली जाते. पण, कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1400 रूग्णांवर उपचार केलेले असताना केवळ 55,000 रूपये त्यांना मिळाले.
– अशीच स्थिती राज्यातील जवळपास सर्वच रूग्णालयात आहे.
राज्यात केवळ 9000 केसेसच्या बाबतीत निर्णय झाले आहेत. चार-पाच महिने जर त्यावर निर्णय होत नसतील, तर त्याचा अतिशय गंभीर परिणाम रूग्णसेवेवर होतो आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
– रेमडेसिवीर हे कोरोना रूग्णांसाठी महत्त्वाचे औषध मानले जाते. पण, ते देणे कालपासून बंद करण्यात आले आहे. सामान्य माणूस हे औषध खरेदी करू शकत नाही. असा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय तत्काळ रद्द करावा आणि संभ्रम असेल तर तो सरकारने दूर करावा.
– कोविडव्यतिरिक्त अन्य रूग्णांची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयांमध्ये जीवनदायी योजनेची सोय नाही. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग करता येऊ शकतो. गेल्या 5 वर्षांत या निधीचा वापर करीत आम्ही मोठा फायदा रूग्णांना करून दिला.
– खोटं बोल पण रेटून बोल, अशी या सरकारची अवस्था आहे.
जीएसटीचे गेल्यावर्षीचे संपूर्ण पैसे राज्याला मिळालेले आहेत. ही मागणी मार्चनंतरच्या काळातील आहे. मार्चनंतर केंद्रालाही पैसा मिळालेला नाही आणि राज्यालाही मिळालेला नाही. तरीही अडचणीच्या काळात केंद्र मार्ग काढते आहे.
– सचिन सावंत यांचे ट्विट हे नैराश्याच्या मानसिकतेतून.
हे प्रकरण राज्यात असताना संदीपसिंगची चौकशी मुंबई पोलिसांनी का केली नाही?
आज नवनवीन बाजू समोर येत असताना ट्विट केले जात आहेत.
या प्रकरणात राजकारण नव्हे, लोकांना सत्याची अपेक्षा आहे.























