महाराष्ट्र शासन सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण कृषी-उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाला 6 महिने मुदत वाढ दिली आहे. दि.3 सप्टेंबर 20 रोजी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत होती.6 महिने मुदत वाढ देवून याच संचालक मंडळाला बाजार समितीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपविली आहे.
संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारभार येणार का या विषयी उलट सुलट चर्चा सुरु होती. पण फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांचे संचालक मंडळाने २००८ ते २०१४ आणि सन २०१५ ते २०२० या १० वर्षाच्या कालावधीत बाजार समितीच्या कामकाजात अमुलाग्र बदल करतानाच बाजार समिती खऱ्या अर्थाने शेतकऱ्याभीमुख करण्यासाठी अनेक योजना, उपक्रम यशस्वीरित्या राबविले असल्याने शेतकरी समाधानी असताना शासनाने या संचालक मंडळाला ६ महिने मुदतवाढ दिल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी व अन्य घटकांच्या साथीने श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने गेल्या १० वर्षात केलेली प्रगती, शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या सोई सुविधा निश्चितच शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरल्या आहेत.त्यामुळे संचालक मंडळाच्या मुदतवाढीची घोषणा होताच विविध स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासह बरड व ढवळ बाजार आवार विकसीत होत आहे. तसेच बाजार समितीने तालुक्याच्या विवीध 3 भागात कृषीदेव पेट्रोलियम योजनेंता तालुक्यात १२ ठिकाणी पेट्रोलपंपाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने केलेल्या सकारात्मक साथीमुळे आगामी काळात डीझेल पेट्रोल उपलब्ध होणर आहे. त्याला जोडूनच खते, किटकनाशक औषधे,बी -बियाणे आणि शेतीविषयक सर्व काही तेथेच उपलब्ध करुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. बाजार समितीच्या आवारात सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी करुन शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दर्जेदार वैद्यकिय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असून लवकरच सदर हॉस्पिटल व व्यापार संकुलाची उभारणी बाजार समितीच्या आवारात करण्यात येणार आहे. बाजार समितीने कार्डीयाक अॅम्ब्युलन्स खरेदी केली असून त्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबातील रुग्णाला शहरातील रुग्णालयात दाखल करण्याची त्याचप्रमाणे सर्पदंशासारख्या प्रसंगात तातडीने आवश्यक वैद्यकिय सेवा या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील असताना बाजार समितीनेही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात अगदी वाडीवस्तीवर वैद्यकिय सेवा सुविधा पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या काही महिन्यात केला आहे.