११ मार्च २०२२ : हंगामा प्ले, या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने आपली अद्यावत हिंदी ओरिजनल सीरीज स्वांग लाँच केली केली आहे. या मालिकेमध्ये भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील काही दिग्गज झळकणार असून त्यात अनुष्का सेन, हितेन तेजवानी, मानसी श्रीवास्तव, अनुराग शर्मा आणि अलन कपूर यांचा समावेश आहे. ही रहस्यमय मालिका दोन बहिणींच्या आयुष्यावर आधारित असून त्या आपल्या वयाच्या पलीकडे जात रहस्याची उकल करताना दिसतील. हिमालयातील निसर्गरम्य प्रदेशात चित्रित करण्यात आलेल्या या मालिकेची निर्मिती एबझ ओरिजनल यांनी केली असून नितेश सिंग यांनी तिचे दिग्दर्शन केले आहे. या मालिकेत प्रसिद्ध कलाकारांबरोबरच प्रकाश रामचंदानी, अवधेश कुशवाहा, निखिल लुलानी आणि समायरा वालिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
मुस्कान (अनुष्का शेन) आपली बहीण डिंपलबरोबर एका अनाथाश्रमात राहात असते. हरवलेला कॅमेरा सापडल्यानंतर या दोघी बहिणी त्यांची फोटोग्राफीची आवड जपण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना याची कल्पनाही नसते, की त्या कॅमेऱ्यात दडलेली धक्कादायक गुपिते त्यांच्या छोट्याशा गावाला उध्वस्त करू शकू शकतात. मनोहर पिंचा (हितेन तेजवानी), स्थानिक शिक्षक, प्रीती (मानसी श्रीवास्तव), एनजीओ कर्मचारी यांच्या मदतीने त्यांना यश मिळतं, पण कोणतीही खूण मागे न ठेवता डिंपल गायब होते, तेव्हा मुस्कानच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. डिंपलचं गायब होणं आणि इतर काही लहान मुलांचे खून यांचा संबंध लावायला सुरुवात होते, तेव्हा तिच्या मनात खोलवर रूजलेली भीती खरी व्हायची चिन्हं दिसून लागतात. इन्स्पेक्टर बलराम (अनुराग शर्मा) आणि पत्रकार सायन शर्मा (अलन कपूर) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मोठं छडयंत्र उघडकीस येतं, मात्र बलराम खरंच चांगला पोलिस असतो की दुनियेसमोर तो तसं भासवत असतो? सायन त्या गावातलाही नसतो, मग त्याला या केसमध्ये इतका का रस असतो? प्रीती सारखी मनोहरची भेट का घेत असते? आणि मुस्कानच्या आयुष्यात मनोहरचं स्थान नेमकं काय असतं? या सुंदर, निद्रिस्त गावात प्रत्येकाकडे लपवण्यासारखं काहीतरी रहस्य असतं आणि कोणीच आपला मुखवटा उतरवत नसतं.
या मालिकेविषयी हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, ‘हंगामामध्ये आम्ही कायमच आधुनिक गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असतो. क्राइम- थ्रिलर प्रकारच्या मालिका खूप लोकप्रिय होतात आणि स्वांग हा थ्रिलर त्यातल्या वळणांमुळे प्रेक्षकांना नक्की आवडेल. अशी आशा आहे.’
आजपासून सुरू होत असलेली ही मालिका हंगामा प्ले या हंगामा व्हिडिओच्या ऑन- डिमांड प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. हंगामा आपल्या दमदार वितरण नेटवर्कच्या मदतीने जगभरातील 150 दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत ही मालिका पोहोचवेल. त्याशिवाय स्वांग व्होडाफोन प्ले, आयडिया मूव्हीज अँड टीव्ही, एयरटेल एक्सट्रीम अॅप, अॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक, टाटा स्काय बिंज, एमएक्स प्लेयर आणि अँड्रॉइड टीव्हीवर हंगामा प्लेच्या माध्यमातून स्ट्रीमसाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय हंगामाच्या शाओमीसोबतच्या सहकार्यामुळे ग्राहकांना मी टीव्हीवर हंगामा प्लेच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म पाहता येईल.