महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (कोरेगाव)
संपूर्ण कोरेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत, तर ऑक्सिजनचीही प्रचंड कमतरता आहे, ही गरज ओळखून कोरेगाव शहरातील विविध सामाजिक संघटनानी एकत्र येत ‘मिशन ऑक्सिजन’ उभारले असून आम्ही कोरेगावकर ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची गरज म्हणून मोफत ऑक्सिजन मशीन देण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन वाचून जीव गमवावा लागला आहे, ही परिस्थितीबदलण्यासाठी कोरेगाव शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना, व्यवसायिक, तसेच दानशूर व्यक्तींना स्वयंचलित ऑक्सिजन यंत्रणा उभारणीसाठी आवाहन करण्यात आले होते, त्याचा शुभारंभ आज भैरवनाथ फौंडेशन व कोरेगाव नगर विकास कृती समितीच्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक सी. आर. बर्गे यांनी एक ऑक्सिजन मशीन देऊन केला आहे. नागरिकांना मदतीसाठी आवाहन केल्या नंतर अवघ्या काही तासातच पहिले ऑक्सिजन मशीन देणगी स्वरूपात मिळाले असून ते गरजूंसाठी लगेच जागेवर जाऊन उपलब्ध करण्यात आले आहे.
कोरेगाव मधील सर्व जनतेला ऑक्सिजन मशीनसाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर आज दुपार पर्यंत सुमारे १ लक्ष २० हजार रुपये आम्ही कोरेगावकर ऑक्सिजन ग्रुपला देण्यात आले आहेत. कोरेगाव मधील रुग्णांसाठी ऑक्सिजन मशिन्स मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा, ज्यामुळे आपल्याबांधवांचा जीव वाचणार आहे.दानशूर नागरिकांनी या लोकोपयोगी उपक्रमासाठी आपला खारीचा सहभाग लोकवर्गणी अथवा ऑक्सिजन मशीन देऊन करावा अशी विनंती ही आम्ही कोरेगावकर ऑक्सिजन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.