महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ११ जानेवारी : साताऱ्यातील श्रीपतराव पाटील पाटील हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे ‘परीक्षा फी’ च्या नावाखाली गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेतून करण्यात आलेला भ्रष्टाचार ही अत्यंत निंदनीय व गंभीरबाब असून या प्रकरणाची सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेश महासचिव किरण कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत अधिक बोलताना कांबळे पुढे म्हणाले, सातारा (करंजेपेठ) येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही शासन मान्यताप्राप्त आणि अनुदानित शाळा १९६९ साली स्थापन झालेली शाळा आहे. समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना या ठिकाणी चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने सदरची शाळा स्थापन केलेली असून अलीकडच्या काळात शिक्षण संस्थेच्या परवानगीने या शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करून ‘परीक्षा फी’ नावाखाली लाखो रुपये गोळा करून शाळा व शिक्षण संस्था वेगवेगळ्या मार्गाने त्याचा उपभोग घेत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून ‘परीक्षा फी’ नावाखाली गोळा केलेली लाखों रुपयांची रक्कम मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेने स्वतःच्या लाभासाठी उपभोगली असून आजही त्याचा उपयोग घेणे चालू आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापकांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे ‘परीक्षा फी’ च्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कडून गोळा केलेल्या लाखो रुपयांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार केलेला दिसून येत आहे. यामध्ये शालेय पोषण आहाराचे दप्तर तपासणीच्या नावाखाली पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचे भेटीचे नावाखाली लाच देण्याबरोबरच संस्थेच्या सभेच्या वेळी संस्था पदाधिकाऱ्यांना जेवणावळी, शाळा व संस्था यांचे ऑफिस मधील खर्च, वीज बिल, फोन बिल, शाळा व संस्थेतर्फे करण्यात आलेले जाहिरात फलक, शाळा व ऑफिस यांचे मानधन, शाळेतील शिपाई कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी कारणासाठी वापरण्यात आलेली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. कांबळे पुढे म्हणाले,विद्यार्थ्यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने गोळा केलेले लाखो रुपये विद्यार्थ्यांना त्वरित परत करावेत. दोषीवर लवकरात लवकर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. साताऱ्यात इतका गंभीर प्रकार घडलेला असताना शिक्षण विभागाकडून अजून साधे स्टेटमेंट सुद्धा आलेले नाही? याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र यांचा तीव्र निषेध केला जाईल, याची संबंधित विभागांनी नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्याकडून बेकायदेशीरपणे घेतलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत करून पुन्हा असा प्रकार होणार नाही, यासाठी जिल्हास्तरावर पारदर्शक यंत्रणा राबविण्याची मागणी कांबळे यांनी याप्रसंगी केली.