देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार ‘ केंद्रीय जल जीवन मिशन ‘ अंतर्गत घरोघरी पाणी ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना देशभरात वेगाने सुरू असून माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या जलजीवन मिशनच्या केंद्रीय समितीवर सदस्य आहेत.
त्यांनी पहिल्या टप्प्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ आणि माण खटाव या विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना मंजूर करून घेतली आहे. फलटण मतदार संघातील 71 व माण खटाव मधील माण तालुक्यातील 104 व खटावमधील 77 आशा एकूण 181 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. माण तालुक्यासाठी रु. 23 कोटी 2 लाख 65 हजार तर खटाव तालुक्यासाठी 33 कोटी 80 लाख 97 हजार असा माण, खटाव मतदारसंघासाठी एकत्रित 56 कोटी 83 लाख 62 हजार रुपये निधी मंजूर करुन आणला आहे.सातारा जिल्ह्यातील या तालुक्यांची कायम दुष्काळी व पिण्याच्या पाण्याचे कायमच दुर्भिक्ष अशी वर्षानुवर्षांची ओरड होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सर्व प्रथम या गरजू तालुक्यांना मिळत आहे. त्याखेरीज माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या योजनेच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. या योजनेचे स्वरूप व महत्त्व लक्षात घेता खासदारांनी फलटण कोरेगाव व माण खटाव मधील अशा एकूण 252 गावांना घरोघरी नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती दिली.
या महत्वकांक्षी योजनेचा माण खटाव तालुक्यातील एकूण 181 गावांना रुपये 56 कोटी 83 लाख 62 हजार असा भरघोस निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणला आहे. या योजनेद्वारे केंद्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाची कार्यवाही होणार आहे. माण व खटाव दोन्ही तालुक्यातून या योजनेसाठी कोणत्याही कालव्यातून पाणी उपलब्ध होत नसून पाणी स्रोत उपलब्ध सुविधे नुसार केला जाणार आहे. या योजनेनुसार काही गावांची कामे पूर्ण झाली असून काही गावांची कामे प्रगती पथावर आहेत. कामाची व्याप्ती व स्वरूप मोठे असल्याने डी. पी. आर. सादर करणे, प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव देणे, तशा मान्यता घेणे, निविदा काढणे, अंदाजपत्रक तयार करणे ही कामे वेगाने सुरू आहेत.
केंद्र शासनाची ही योजना देशभरामध्ये सन 2024 पर्यंत सुरू असेल. तरीही अगदी प्राथमिक स्तरावर फलटण कोरेगाव व माण खटाव या अत्यंत गरजू विधानसभा मतदारसंघासाठी खासदारांनी ही योजना मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात निधी प्राप्त करून कामेही सुरू केली आहेत.