रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील क्रेडीट आणि डेबिट कार्ड धारकांसाठी नवे नियम जारी केले आहेत. हे नवे नियम ३० सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नियम जानेवारी २०२० मध्येच तयार केले गेले होते पण करोना मुळे हे नियम त्यावेळी लागू केले गेले नव्हते.
नव्या नियमानुसार क्रेडीट आणि डेबिट कार्ड धारकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार, डोमेस्टिक व्यवहार, ऑनलाईन तसेच कॉन्टॅक्टलेस व्यवहार करताना प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. म्हणजे ग्राहकाला गरज असेल तरच सेवा घेता येणार आहे आणि त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. नवे नियम लागू करताना ग्राहक अधिक सुरक्षित व्यवहार करू शकेल याची काळजी घेतली गेली आहे.
नव्या नियमानुसार ग्राहक स्वतः त्याची ट्रान्झॅक्शन लिमिट ठरवू शकणार आहे. ही सेवा दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे साती दिवस घेता येईल. याचा अर्थ युजर एटीएम ट्रान्झॅक्शन लिमिट स्वतः ठरवू शकेल. तसेच त्याला विदेशी ट्रान्झॅक्शन सुविधा कधीही घेता येईल. कार्ड संदर्भातील कोणतीही सेवा अॅक्टीव्हेट करणे किंवा काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा ग्राहकाला मिळणार आहे.
आरबीआयने बँकांना दिलेल्या निर्देशानुसार बँकेने क्रेडीट डेबिट कार्ड देताना ग्राहकांना स्थानिक ट्रान्झॅक्शन परवानगी द्यायची आहे. म्हणजे ग्राहकाला गरज नसेल तर एटीएम मधून पैसे काढणे व पीओएस टर्मिनल वर शॉपिंग साठी विदेशी ट्रान्झॅक्शन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. नुकत्याच केलेल्या एक पाहणीत लॉकडाऊन काळात क्रेडीट कार्ड पेक्षा डेबिट कार्डचा वापर अधिक झाल्याचे दिसून आले आहे. यात हे प्रमाण दर १५ डेबिट कार्ड मागे १ क्रेडीट कार्ड असे होते.