मुंबई : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात 2022 साली बारावीची लेखी परीक्षा चार मार्च रोजी होणार असून 10वींची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.“ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण दहावी आणि बारावी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. यधिरीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीत होईल. तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. बारावीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलल आहे.