हॉस्पिटलच्या 3 कर्मचाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान; इतरांनी पुढे येण्याचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दि . १९/०९/२०२० शनिवार रोजी प्लाझ्मा संकलन केंद्रास प्रारंभ करण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. तसेच त्याच्या प्रतिबंधाची लसही अजून संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय असून, या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्माफेरेसिस युनिट साकारण्यात आले असून, रक्तातून प्लाझ्मा घटकांचे विलगीकरण करणाऱ्या अद्ययावत यंत्रसामग्रीचीही उभारणी करण्यात आली आहे. या प्लाझ्मा संकलन केंद्राचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलमधील 3 कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला. जे रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशा रूग्णांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी डॉ. भोसले यांनी केले.
याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विश्वास पाटील, राजेंद्र संदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते
कृष्णा हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मा संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस डॉ. प्रवीण शिणगारे, डॉ. एम. व्ही. घोरपडे, पी. डी. जॉन, डॉ. ए. वाय. क्षीरसागर व अन्य मान्यवर.