भारताने चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर काही आठवड्यातच अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत चीनी सोशल मीडिया अॅप टीक-टॉक आणि व्हीचॅटवर रविवारपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या बंदीनंतर चीनने देखील टीका केली आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिका त्रास देत असून, याबदल्यात अनपेक्षित निर्णय घेतले जाऊ शकतात. चीनने अमेरिकेला धमकी देणे सोडून देणे, चुकीचे कार्य करणे थांबविणे आणि प्रामाणिकपण, पारदर्शक आंतरराष्ट्रीय नियम व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली आहे.
मागील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टीक-टॉक आणि व्हीचॅटवर बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर सही केली होती. याअंतर्गत दोन्ही कंपन्या आपली मालकी अमेरिकन कंपन्यांना विकू शकतात. मात्र टीकटॉकने मायक्रोसॉफ्टला विक्री करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस म्हणाले की, अमेरिकेच्या नागरिकांची वैयक्तिक माहिती जमा करण्याच्या चीनच्या या दुर्भाग्यपुर्ण कृत्याशी लढण्यासाठी आम्ही महत्त्वपुर्ण कारवाई केली आहे. वाणिज्य विभागाने अन्य सोशल मीडिया अॅप्सना देखील व्हीचॅट आणि टीकटॉकच्या बेकायदेशीर वर्तनाची कॉपी करण्यावरून इशारा दिला आहे.
आदेशानुसार, 20 सप्टेंबरपासून व्हीचॅट आणि 12 नोव्हेंबरपासून टीक-टॉकसाठी अमेरिकेत इंटरनेट होस्टिंग सेवेवर निर्बंध असेल. यात कंटेट डिलिव्हरी नेटवर्क सेवेवर देखील निर्बंध असेल.