पुणे,दि. २ : जिल्ह्यात ‘कोविड-१९’आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे,नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये,ससून रुग्णालय,बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत ‘पोस्ट कोविड ओपीडी‘सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली,यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीव्दारे),पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,खासदार डॉ.अमोल कोल्हे,खासदार वंदना चव्हाण तसेच आमदार अशोक पवार,आमदार राहुल कूल,आमदार सुनील शेळके,आमदार चेतन तुपे,आमदार अण्णा बनसोडे,आमदार सुनील कांबळे यांच्यासह पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव,ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस चोक्कलिंगम,पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे,आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील,ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार,जिल्हा टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. डी. बी.कदम तसेच वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर व ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,जिल्ह्यातील कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यांना औषधोपचार व समुपदेशन देण्याच्या दृष्टीने ‘पोस्ट कोविड ओपीडी‘लवकर सुरु होणे आवश्यक आहे. शहरातील 5 रुग्णालयातही ओपीडी सुरु झाल्यानंतर अन्य रुग्णालये व ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने ही सुविधा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत,असे सांगून कोविड रुग्णांवर उपचार करताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही पालन करावे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्ती अभावी बंद राहू नयेत,याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच कोविड रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कंपन्यांच्या कामगारांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये,यासाठी कंपन्यांमध्ये प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हायला हवे,असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘मोहिमेच्या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षणावर भर देत बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल. शहरात काही नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले,सध्या शहरात बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे,तथापि,आरटीपीसीआर सह अन्य चाचण्या वाढवणे आवश्यक आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तपासण्यांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी बरोबरच अन्य अत्याधुनिक तंत्रांचा वापर व्हायला हवा,असे सांगितले. खासदार वंदना चव्हाण,आमदार सर्वश्री अशोक पवार,राहूल कुल,सुनील शेळके,चेतन तुपे,अण्णा बनसोडे,सुनील कांबळे,आदी लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. सध्या बेडची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना वेळेत बेड उपलब्ध होत असल्याचे सांगितले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रेमडेसीविर औषधसाठा पुरेसा ठेवावा,पोस्ट कोविड सेंटर लवकर सुरु करावेत,सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी घरी उपचार घ्यावेत,यासाठी रुग्णालयांना सूचना देण्याबरोबरच नागरिकांची कोविड आजाराविषयीची भीती कमी होण्यासाठी जनजागृती करावी,शहरातील दराच्या तुलनेत ग्रामीण भागातील उपचारासाठीचे दर कमी व्हावेत,अशा सूचना केल्या.डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले,कोरोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांना सौम्य अथवा गंभीर शारीरिक त्रास जाणवू शकतो,हे गृहीत धरुन ‘पोस्ट कोविड व्यवस्थापन‘आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. कोरोना रुग्णांना बेड व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना समुपदेशन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील,जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी.कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.