मास्कचा वापर आणि शारिरीक अंतराचे पालन बंधनकारक
पुणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’ नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
आदेशानुसार ६५ वर्षे वयावरील नागरिक, को-मॉर्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्ष वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या ठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोविड- १९ ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्येक नागरिक, भेट देणारे व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्कचा वापर केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. साबणाने वारंवार हात धुवावेत (कमीत कमी ४०-६० सेकंद पर्यंत) अथवा हात निर्जंतुक करण्यासाठी अल्कोहोल मिश्रीत सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा. (कमीत कमी २० सेकंद). श्वसनाबाबत शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करण्यात यावे. खोकताना व शिंकताना तोंड व नाक झाकणे, शिंकताना टिश्यू पेपर , हातरुमाल, हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा व टीश्यू पेपरची विल्हेवाट योग्यरित्या करावी.
भाविकांच्या आरोग्याबाबत पाहणी करुन आजारी असल्यास आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. धार्मिक स्थळे अथवा प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यात यावा.
प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच मंदीरात प्रवेश देण्यात यावा. कोविड-१९ विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक अथवा भित्तीपत्रके ठळक अक्षरात दिसतील अशा ठिकाणी लावावीत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत श्राव्य किंवा चित्रफीतद्वारे दररोज प्रसारण करावे. अभ्यागतांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात यावा. धार्मिक स्थळांचा आकार, खेळती हवा या बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत ट्रस्ट किंवा बोर्डाच्या अध्यक्षांनी धार्मिक स्थळात एका वेळी किती व्यक्ती किती वेळेसाठी थांबवता येतील याचा विचार करुन वेळा ठरवून द्याव्यात. पादत्राणे हे स्वतःच्या वाहनांमध्ये ठेवणेबाबत भाविकांना सूचित करावे. आवश्यकतेनुसार पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्ररित्या व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळांच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून व्यवस्थापन करण्यात यावे. बाहेरील आवारात असलेली दुकाने, स्टॉल्स, उपहारगृहाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन व कोविड नियमावलींचे पालन करुन गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.
दर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रांगेत उभे राहण्यासाठी खुणा करुन सहा फुट अंतर ठेवण्यात यावे. अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाबाबत व्यवस्था करण्यात यावी. रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये सहा फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील. नागरिकांनी याठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय साबण व पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ धुवावेत. नागरिकांना बसण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन बैठक व्यवस्था करण्यात यावी. वातानुकूलीत करीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सूचनांचे पालन करण्यात यावे. वातानुकूलीत आवारात तापमान हे २४-३० डिग्री करण्यात यावे व सापेक्ष आर्द्रता ४०-७० असावी, तर पुरेशी खेळती हवा असण्याबाबत दक्षता घ्यावी.
मुर्ती ,पुतळा , पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील. मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे मेळावे किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.कोविड- १९ पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता ध्वनीमुद्रीत केलेले भक्तीपर गाणे, संगीत वाजवण्यात यावे. परंतू वादक किंवा गायन गटास प्रतिबंध राहील. शारिरीक संपर्क टाळण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा देण्यास प्रतिबंध राहील. सामुहिक प्रार्थनेसाठी एकच चटाईचा उपयोग शक्यतो टाळावा. भक्तांनी स्वतःकडील चटाई किंवा कापडाचे तुकडे घरुन आणावे व परत जातांना सोबत घेऊन जावे.
धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणतेही अर्पण उदा. प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी बाबी प्रतिबंधीत राहतील. धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. आवारात असलेले शौचालये व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा. धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याची जवाबदारी संबंधित ट्रस्ट किंवा संस्था यांची राहील. परिसरातील तळफरशीचा भाग वारंवार स्वच्छ करण्यात यावा.
अभ्यागतांनी सोडून किंवा फेकून दिलेले फेस कव्हर,मास्क,ग्लोव्हज इत्यादींचे योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात यावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार, कर्मचारी यांना कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कामावर हजर होण्यापूर्वी तसेच आठवड्यातून कोविड-१९ चाचणी करणे आवश्यक राहील. शौचालये तसेच खाणावळी परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागा, अंतर व संख्या याबाबतचे व्यवस्थापन कोविड नियमावलींचे पालन करुन करण्यात येईल. याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक राहील.
धार्मिक स्थळांच्या परिसरात कोविड-१९ चे संशयीत रुग्ण अथवा बाधित रुग्ण आढळून आल्यास अशा व्यक्तीस एका स्वतंत्र खोलीमध्ये किंवा परिसरात इतर लोकांपासून विलगीकरण करावे.अशा व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांचेकडून पडताळणी होईपावेतो चेहऱ्यावर मास्क परिधान करणेबाबत सूचित करावे.अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयास कळविण्यात यावी. अशा रुग्णांचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत परिक्षण करण्यात येईल व सदरची केस हाताळण्याबाबत आवश्यक ते व्यवस्थापन करून अशा व्यक्तींचे संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेवून तो राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येईल. बाधित रुग्ण आढळून आल्यास तेथील आसपासचा परिसर तात्काळ निर्जंतुकीकरण करावा.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्ती ही भारतीय दंड संहिता, १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.