डबेवाडी गावाच्या विकासात महिलांचे योगदान आदर्शवत सौ. वेदांतिकाराजे; गावातील घरकुल योजनेचा केला शुभारंभ
सातारा- आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक ठिकाणी आघाडीवर आहे. डबेवाडी ग्रामपंचायतीच्या महिला कारभारी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी गावाचा सर्वांगिन विकास साधण्याचा निर्धार केला आहे. डबेवाडी गावाच्या विकासात या महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी एक आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
डबेवाडी ता. सातारा येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यातून ३६ घरकुले मंजूर झाली आहेत. डबेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून या घरकुल योजनेचा शुभारंभ सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. कमल जाधव, डबेवाडीच्या सरपंच सौ. उमा माने, सदस्या शामल भोसले, स्नेहल कदम, अश्विनी चव्हाण, नलिनी माने, स्वाती भोसले, अवॉर्ड संस्थेच्या सचिव नीलिमा कदम, ग्रामसेविका शीतल साळुंखे आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

डबेवाडी ग्रामपंचायतीने पात्र लाभार्थ्यांसह दिव्यांग महिलांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. या लाभार्थ्यांची भेटही सौ. वेदांतिकाराजे यांनी घेतली आणि विचारपूस केली. डबेवाडी ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवत आहे. सरपंच आणि त्यांच्या सहकारी सदस्य महिलांना गावातील समस्यांची जाण आहे. या समस्या सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. गावातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवून डबेवाडी ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत आणि एक आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
































