महाराष्ट्र न्यूज कोरेगांव प्रतिनिधी /अधिक बर्गे : सातारा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या सर्वात हायव्होल्टेज ग्रामपंचायत निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात होत असून, ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी एकूण ११५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोरेगाव शहराला अक्षरश: यात्रेचे स्वरुप आले होते. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत म्हणजेच बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर दाखल झालेल्या अर्जांची संख्या ११५६ इतकी झाली आहे. गुरुवार दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, अशी माहिती तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिली.
रहिमतपूर रस्त्यावर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेज आवारातील इनडोअर स्टेडियममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी सकाळपासून प्रचंड गर्दी होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या आवारात उपस्थित असलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेण्यात आले, त्यामुळे ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात आली होती, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे व निवडणूक शाखेचे लिपिक युवराज खाडे यांनी दिली. गुरुवार दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीयदृष्ट्या मात्तबर असलेल्या वाठार-किरोली, देऊर, पाडळीस्टेशन अर्थात सातारारोड, सोळशी, वाठार स्टेशन, किन्हई, ल्हासुर्णे, जांब बुद्रुक, नांदवळ, सुर्ली, भिवडी आदींसह प्रमुख गावांमध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.