सुनिल निंबाळकर / पुणे प्रतिनिधी
मोरगांव ता.२१ -: राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गोवा राज्यात विक्रीस असलेल्या दारूची अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडलेले आहे . सुमारे अडीच लाख रुपयांची हा मुद्देमाल ताब्यात घेतला असून शासनाची मोठी महसूल हाणी टळली आहे .उत्पादन शुल्काच्या जी विभागाच्या युनीट दोनने ही कारवाई केली .
दौंड तालुक्यातील कानगाव रस्त्यावरून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या दारुची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्कास समजली . सदरची कारवाईची आखणी आयुक्त कांतीलाल उमाप , संचालक (अ.व द.) सुनील चव्हाण तसेच पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे तसेच उपअधीक्षक, संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. कान्हेकर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग बीट क्र. २ पुणे यांनी केली.
या कारवाईत बी.व्ही. ढवळे निरीक्षक, विकास थोरात, सतीश काळभोर, दुय्यम निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान चंद्रकांत इंगळे,मोहन गवळी,सोहन मालुसरे, नवनाथ पडवळ, वाहनचालक, प्रमोद खरसडे यांनी सापळा लावला होता . मिळालेल्या मागीतीनुसार कानगांव –हातवळण रस्त्यावर , प्राथमिक शाळेजवळ संशयीत कार क्र. एमएच १७ ए.जी ५७२४ यास थांबण्याचा इशारा करून कार बाजूला घेऊन कारमधील मुद्देमालची तपासणी केली .
गाडीमध्ये प्रथमदर्शनी खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. सखोल तपासणी केली असता मद्याचे बॉक्स असल्याचे आढळुन आल्यानंतर गाडी व मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहनाचा चालक प्रशांत अरूणराव भोर, ( वय ३१ वर्ष रा.काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) यास ताब्यात घेतले आहे .गाडीमध्ये मॅक्डोवल व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०९ बॉक्स , इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०४ बॉक्स , इम्पिरीअल ब्ल्यू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०४ बॉक्स असे एकूण १७ बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत २ लाख ४३ हजार ५६० रुपये आहे. वरील आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (क, ङ), ८१ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना मे. न्यायालय दौंड, जि . पुणे येथे हजर करण्यात आले. या विभागाने वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत . सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. के. कान्हेकर हे करीत आहेत.