पाटण : सामाजिक कार्य करताना आपले पद, वय, शिक्षण याचे काहीही बंधन नसते. महाविद्यालयीन जीवनात समाजसेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक चांगले व्यासपीठ आहे, असे मत सातारा जिल्हा डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकरराव शेडगे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एस. डी. पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून एन. एस. एस. कार्यक्रम अधिकरी डॉ. जी. एस. पट्टेबहादूर, डॉ. एल.एस. भिंगारदेवे, प्रा. बळीराम लोहार हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रम औजारांचे पूजन करण्यात आले. त्यांनंतर कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन पट्टेबहादूर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले सामाजिक उपक्रम याची माहिती दिली त्यानंतर शंकर शेडगे पुढे म्हणाले की, युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असते. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना ते म्हणाले की, समाजकार्य करताना कसलेही बंधन नसते. एखाद्या वृद्ध व्यक्तीला पेपर वाचून दाखविला किंवा आताच्या घडीचा विषय म्हणजे ई-पीक पाहणी होय विद्यार्थ्यांनी गावातील स्मार्टफोन न वापरता येणाऱ्या शेतकरी बांधवाना ई-पीक पाहणी जरी करून दिली किंवा माहिती सांगितली तरी ती समाजसेवा होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. एस.डी. पवार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी युवक तत्पर व सक्षम व्हावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर या दोन उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. नियमित कार्यक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार हे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमातून घेऊन श्रमदान, युवा सप्ताह, कार्यशाळा, शिबिर, सरकारच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होतात, असे मत व्यक्त केले.
डॉ. लालासाहेब भिंगारदेवे यांनी आभार मानले तर डॉ. एच.व्ही. काटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. अमोल मोहिते, प्रा.दिनेश रेवडे यांच्यासह विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या