महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड : कोरोना संक्रमणामुळे अनेक संस्थांना यंदाचे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीचे गेले. या काळात अनेक कंपन्या व संस्था डबघाईला आल्याने, या कंपन्यांतील कर्मचार्यांवर बेकारीची वेळ आली. अनेक बँकांचे विलीनीकरण, तर सहकारात काही बँका बंद पडल्याचीही उदाहरणे आहेत. अशा संकटाच्या काळात कृष्णा सहकारी बँकेने आपल्या कर्मचार्यांना सरासरी 20 टक्क्यांची भरघोस पगार वाढ देत, कर्मचार्यांचे हित जपले आहे. कोरोनाच्या संकटकाळातही कृष्णा बँकेची कर्मचार्यांचे हित जोपासणारी ही अनोखी कृती सहकार क्षेत्रात आदर्शवत ठरली असून याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेने कोरोना काळातही नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. कोरोना काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेचे कर्मचार्यांनी मोठे साहस दाखविले. या काळात नियमित बँक सुरू ठेऊन ग्राहकांना ठेवींसह अन्य सुविधा देत, बँकेने लोकांना मोठा आर्थिक आधार मिळवून दिला. बँकेच्या कर्मचार्यांनी कोरोना काळात दिलेल्या या योगदानाची दखल घेत, बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सरासरी 20 टक्क्यांची भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कर्मचारी संवाद मेळाव्यात जाहीर केला.
पारदर्शी कारभार व ग्राहकाभिमुख सेवा यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने यंदा सुवर्ण महोत्सवी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या 96 व्या जयंतीचे औचित्य साधून बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेसह जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था व कृष्णा महिला सहकारी पतसंस्था या तिन्ही संस्थांतील कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, स्व. जयवंतराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन अलका जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. कापसे, अरुण यादव व नितीन देसाई प्रमुख उपस्थित होते.
चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, आप्पासाहेबांनी या भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व लोकांना बचतीची सवय लागावी यासाठी 50 वर्षांपूर्वी कृष्णा बँकेची स्थापना केली. या 50 वर्षांच्या काळात बँकेला अनेक संघर्षातून जावे लागले. पण सभासदांचा अढळ विश्वास व सेवकांचे भक्कम पाठबळ या जोरावर बँकेने देदीप्यमान कामगिरी केली.
ग्रामीण बँक म्हणून स्थापन झालेल्या कृष्णा बँकेने 600 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा एकत्रित व्यवसाय केला आहे. 21 डिसेंबर 2020 अखेर बँकेकडे 403 कोटी 38 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 235 कोटी 96 लाख रुपयांची कर्जे वितरित केली असून नेट एन.पी.ए. शून्य टक्के राहिला आहे. येत्या 2 वर्षात बँक 1000 कोटींचा व्यवसाय टप्पा पार करेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील, अॅड. विजयकुमार पाटील, तातोबा थोरात, महादेव पवार, पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, हरिभाऊ पाटील, मार्केटिंग विभागप्रमुख सिद्धार्थ चक्रवर्ती, उपव्यवस्थापक गणपती वाटेगावकर, भगवान जाधव, विजय सातारकर आदी उपस्थित होते. सी. एन. कापसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पोपटराव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी आभार मानले.
कोविड योद्धा पुरस्काराने कर्मचारी सन्मानित
कोरोना काळात उत्तम कामगिरी करत ग्राहकांना संकटाच्या काळातही सेवा देणार्या बँक व पतसंस्थांच्या सर्व कर्मचार्यांना या कार्यक्रमात कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कर्मचार्यांना प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेले सी. एन. कापसे यांचा विशेष गौरव केला.