पाटण : कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवलेला ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झालेल्या ३.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला बारा किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. कोयना धरणापासून केंद्रबिंदूचे अंतर २८ किलोमीटर आहे. भूकंपाची खोली १५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. हा भूकंप कोयना, पाटण, कराड, चिपळूण, पोफळी आदी सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागात जाणवला. या भूकंपामध्ये कोणतीही वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.