सेलू येथे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा एक वर्षाच्या आत उपलब्ध करुन देवू, असे राज्याचे क्रीडामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सेलु येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
तालुका क्रीडा संकुल, सेलू येथील बँडमिंटन वुडन कोर्ट, व्यायामशाळा साहित्य व अभ्यासिकेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, शेखर शेंडे, नप सभापती मुख्तारबी पठाण, किशोर गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, राजन मिश्रा, नप मुख्याधिकारी धनंजय सरनाईक, तालुका क्रीडा अधिकारी अनिल निमगडे आदी उपस्थित होते.
सुरुवातीस पालकमंत्री श्री.केदार यांनी फित कापून लोकार्पण केले तथा वुडन कोर्ट, व्यायामशाळा व अभ्यासिकेची पाहणी केली. तालुकास्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठीच तालुका क्रीडा संकुलाचा निर्मिती खर्च वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सेलू येथे वर्षभरातच चांगल्या सुविधा निर्माण होतील. क्राडा संकुलात चांगली व्यायायशाळा निर्माण करण्यात आली आहे. व्यामशाळेसाठी अधिक जागा उपलब्ध करून घ्यावी, असे पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
युवा खेळाडूंनी शरीर मजबूत ठेवले पाहिजे. शरीर मजबूत असेल तर विचार मजबूत असतात आणि विचार मजबूत असलेल्या खेळाडूंना कोणीही हरवू शकत नाही. सेलू येथील बांधकामात असलेली प्रशासकीय ईमारत तीन महिन्यात पुर्ण करु. नगर परिषदेच्यावतीने विकासाच्या बाबतीत केलेल्या सुचनांची दखल घेऊ, असे पालकमंत्री म्हणाले.
सेलू येथे 25 लक्ष रुपये खर्च करुन वुडन बँडमिंटन कोर्ट तयार करण्यात आला आहे. याठिकाणी कोर्टसह इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहे. तालुका संकुलात सुरक्षा भिंत बांधण्यात येत असून त्याचे भुमिपूजनही पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहल देवतारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी अनील निमगडे यांनी केले. यावेळी खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.