सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झालेल्या आहेत.
येथील पोवईनाका परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. हे कार्यकर्ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले. याबद्दल आम्ही राज्य सरकारचा निषेध करतो. राज्य सरकारने योग्य बाजू मांडलेली नाही. सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. कोविडमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला असता मात्र महामारीमुळे तो उतरु शकत नाही.
मराठा समाज कायदा, सुव्यवस्था पाळणार आहे. जोपर्यंत कोविडचा कार्यकाल आहे तोपर्यंत शांत बसायचे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी रस्त्यावर उतरत नाही म्हणून राज्य सरकारे सुटकेचा नि:श्वास घेऊ नये. आता बास झाले मराठा समाजाची तिसरी लाट येईल. समाजाचा उद्रेक काही दिवसांतच पाहायला मिळेल.
कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मराठा समाजाचे रौद्ररुप राज्य सरकारला दिसेल. पहिल्यासारखे राजकारण राहिले नाही. गैरसमज कोण काय करते स्वत:चे हात कसे काढून घेते, हे समाजाला माहिती आहेत. अख्या महाराष्ट्रातील एक आमदार, एक खासदार सोडले तरी मराठ्यांच्या बाजूने कोणी बोलले नाही. जाणूनबजून दुर्लक्ष केले आहे. राज्याची मिटिंग झाल्यानंतर निर्णय घेऊ. जनतेला, पोलिसांना कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे मराठा समाज शांत राहिल. मात्र कोरोनाची लाट ओसरताच जोरदार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.