मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून १८ मेच्या संध्याकाळी हे चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल. याच काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
१४ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल. १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील. वेगाने वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.