
पळशी वि.का.स. सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या संचालकांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपसभापती नितीन राजगे, नगराध्यक्ष सागर पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, माजी उपसभापती तानाजी कट्टे, बाळासाहेब सावंत, नगरसेवक महेश जाधव व विशाल पोळ, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, सतीश मडके, केशव वणवे, डाॅ. राजेंद्र खाडे, डाॅ. भास्कर गंबरे,आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मानसिंग खाडे, काका खाडे, सुर्यकांत खाडे, सुभाष खाडे, दिनकर नाकाडे, सुर्यकांत येवले, जनाबाई खाडे, यशवंत जळक, सुनील गंबरे, महादेव देवकुळे तसेच स्वीकृत सदस्य श्रीरंग शेळके, तुकाराम भोजने यांचा प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, दहिवडी आणि वडूजच्या नागरिकांनी सत्ता परिवर्तन केल्यामुळे आमदारांचा तोल जावू लागला आहे. अपयश पचवता न आल्याने ते सातत्याने बरळताना दिसत आहेत. त्यामुळे दोन पंतप्रधानांनी पंतप्रधान पुरस्कार देवून माझी लायकी ठरवली असताना हे महाशय अरे तुरे करुन माझी लायकी काढू लागले आहेत. गेली पस्तीस वर्षे मी माझी मालमत्ता शासनाला कळवतो. यांचे असे काय उद्योगधंदे आहेत की हे गाड्या उडवत आहेत. माणमध्ये पैशाचं राजकारण कोणी सुरु केलं? पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस तसेच न्यायालयाने मालमत्ते संदर्भात माझ्या वरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र हे लबाड, नेहमी खोटं बोलत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, खरंतर सांगली पासून पनवेल व्हाया मायणी या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आमदारांच्या सांगलीत कर्तृत्वाच्या सुरस कथा मला अनेकांनी सांगितल्या आहेत. त्या योग्यवेळेला सगळ्यांना सांगेन. मायणी काॅलेज कसं हडप केलं हे माणदेशातील सगळ्या माणसांना माहित आहे. कोविड काळात महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित नव्हते. पण अनेक रुग्ण सांगतात की आमच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा सर्व प्रकार आहे. यांचं काम चांगलं होतं तर सरकारनं बिल का काढलं नाही? का चौकशी सुरु आहे?
पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, कोलांट्या उड्या खाण्यात यांचा हातखंडा आहे. काँग्रेसचा डी.एन.ए. व रक्तात काँग्रेस असणाऱ्यांनी भाजपमध्ये जावून डी.एन.ए. पण बदलला अन डायलेसीस सुध्दा केले. पश्चाताप होतोय असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तर भाजपवाले सुध्दा ही पीडा आमच्याकडे नको असं खाजगीत बोलतात. शरद पवार आमचं दैवत आहे. देशाचे पंतप्रधान सुध्दा त्यांचं बोट धरुन राजकारणात आलो असं म्हणतात. त्या शरद पवार यांच्यावर टिका करणं हे माणचं दुर्दैव आहे.
प्रभाकर देशमुख म्हणाले, भ्रमिष्टासारखं बरळणार्यांना त्यांची जागा दाखवायची गरज असते. उरमोडीचं पाणी हे सरकारचं पाणी आहे. ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. ना हे पाणी प्रभाकर देशमुख देत आहे ना आमदार. टेंभूचं पाणी इतकं दिवस न मिळण्याचं पाप हे आमदाराचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे आमदार होता मग का आणली नाही एम.आय.डी.सी.
फसवणूक करणाऱ्या या लबाडांचं नाटक माणदेशी जनताच बंद करेल.
डाॅ. राजेंद्र खाडे म्हणाले, मात्र माण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही प्रभाकर देशमुख यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व निवडणुकीत आम्ही प्रभाकर देशमुख यांची पाठराखण करणार आहोत. केशव वणवे म्हणाले, नव्या-जुन्यांचा मेळ घालून नव्या जोमाने राष्ट्रवादी पक्षाला बळकट करु. प्रभाकर देशमुख यांना यापुढील काळात पळशी गावातून नेहमीच मताधिक्य देवू. “प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बुध्दिवंतांची खाण असलेल्या या गावातील तरुण मंडळींनी सोसायटी विजयातून तालुक्याला दिशा दिली आहे. पुढील काळात पळशीमधील लोकांनी मागणी केलेले दोन बंधारे बांधून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोडविणार आहे. तरुण कार्यकर्त्यांनी माण मतदारसंघात परिवर्तन करण्याचा दिलेला शब्द मला सार्वजनिक जीवनात प्रेरणादायक आहे.”






























