तातडीने पंचनामे करण्याच्या केल्या सूचना
आंबवणे गावाला भेट जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारपाटण, दि. 19 : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड ढगफुटीमुळे केरा विभागातील आंबवणे, चिटेघरसह इतर गावातील शेती क्षेत्र, घरांची पडझड, वीज पोल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेततळी, ताली, साकव पूल, पाझर तलावर, रस्ते आदी सर्व काही नेस्तनाभूत झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर व पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी करून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित गावकामगार तलाठी यांना केल्या. तसेच नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी नुकसानग्रस्तांना देवून दिलासा दिला.बुधवारी व गुरूवारी अशा दोन दिवस पाटण तालुक्यातील केरा विभागात मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला. येथे ढगफुटी झाल्याने पावसाने अक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. विशेष करून आंबवणे, घाणव, चिटेघर या गावांना ढगफुटीचा मोठा फटका बसला आहे. या ढगफुटीमुळे आंबवणेसह इतर गावांमधील रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, नळपाणीपुरवठा योजना, पाण्याच्या टाक्या, विहीरी, पाझर तलाव, पाईपलाईन, साकव पूल, शेततळीसह शेती क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. पिके तर माती गाढली केली आहेत. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने ओढ्यावरील पूल व रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. याठिकाणी गावचे दळणवळणच बंद झाले असून विद्युत पुरवठाही तीन दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. एकंदरीत केरा विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. केरा विभागातील ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर व सभापती राजाभाऊ शेलार यांनी केली व नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांनीही सत्यजितसिंह पाटणकर यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले.दरम्यान, आंबवणे गावातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, हा ढगफुटीचाच हा प्रकार असून आंबवणे गावातील दोन्ही साकव पूर्णपणे वाहून गेले आहेत. दळणवळणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेचीही फार वाईट अवस्था आहे. त्यामुळे या गोष्टी पूर्ववत कशा होतील याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. शेती, पिण्याच्या योजना, रस्ता खचला असेल, साकव पूल या सर्वांचे पंचनामे शासनाने त्वरीत करून घ्यावेत. केवळ पंचनामे करून न थांबता आर्थिक तरतूदही झाली पाहिजे. तसेच लवकरात लवकर पुर्नंबांधणीची कामे सुरू करण्यास प्रशासनाने सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.सभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, नुकसानीची पाहणी केल्यावर कळाले की ही अतिवृष्टी नसून ढगफुटीच असून आस्मानी संकट निर्माण झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पंचायत राज्य व पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करायला लागतील त्या करू. रस्त्यावर वाहून आलेला भराव तातडीने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनाही पंचयात समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरत्या दुरूस्त करू. पण कायमस्वरूपी जलजीवन मिशन योजनेत या योजना कशा येतील त्यासाठी आपण प्रयत्न करू. संकट फार मोठे असून त्यातून सावरून लोकांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. सत्यजित दादांनी सांगितल्याप्रमाणे ते राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा ते प्रयत्न करतील. मात्र आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.चौकटपाटण शहरातील घरांची पाहणीदोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाटण शहरातही 20 ते 25 घरांमध्ये ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच मुळगावला जाणाऱ्या रस्त्यावरील साकव पूलही खचला आहे. या सर्वांची पाहणी देखील सत्यजितसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.3 Attachments