पाटण प्रतिनिधी :- दि.१६ जून आणि १९ जुलै ते २४ जुलै दरम्यान पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ढगफुटीमुळे डोंगर दरडी ढासळून अनेक जणांचे जिव गेले,अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले. पिक शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी व सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना सद्याच्या सरकारने अद्याप पिडीतांना मदतीसंदर्भात कोणतीच भूमिका घेतली नाही. सरकारच्या या आळशी धोरणा बाबतीत पाटण तहसिलदार कार्यालया समोर शेतकऱ्यांनी बोंब मारुन निषेध व्यक्त केला आहे. सरकारने नुकसानग्रस्त पिडीतांना व शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांसमवेत शासनाकडे निवेदनाव्दारे केली.
यावेळी विक्रमबाबा पाटणकर पुढे म्हणाले गेल्या महिन्यात १९ ते २४ जुलै दरम्यान पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी झाली यावेळी केवळ २४ तासात ७४६ मिलीमीटर पाऊसाची विक्रमी नोंद कोयना विभागात झाली या अतिवृष्टी ढगफुटीने अनेक ठिकाणी दरडी डोंगर ढासळून जिवीतहानी सह मोठ्या प्रमाणात पिक शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतीच गायब झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील होऊन शेतकरी हतबल झाला आहे. १६ जुन रोजी देखील अतिवृष्टीची अशीच परिस्थिती केरा विभागात होऊन केवळ चार तासात ४५० मिलीमीटर पाऊस ढासळला अशी बिकट अवस्था असताना सरकारने अजूनही झोपेचे सोंग घेतले आहे. दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही मदत मिळाली नाही. हि शोकांतिका आहे. असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी व्यक्त करुन पाटण तहसिलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांसमवेत बोंब ठोकून शेतकऱ्यांविषयी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला यावेळी त्यांनी सरकारने पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करवा अशी मागणी केली. यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांच्या समवेत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.