फलटण ; सोमंथळी, ता. फलटण येथील २३फाटा ते बारामती रोडपर्यंतचा रस्ता नव्वदच्या दशकापासुन वादग्रस्त आहे. त्या त्या वेळी रस्ता अडवणुक व खुला करण्याच्या प्रक्रिया होत राहिल्या. परंतु अलीकडच्या तीन चार वर्षामध्ये स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद विकोपास जाऊन हा रस्ता समाजहिताच्या दृष्टीने डोकेदुखी ठरु लागला. तीन चार वर्षांपासून सातत्याने ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, तहसीलदार व प्रांताधिकारी अशाप्रकारे सदर समस्या न्यायासाठी फिरत राहिली. काही दिवसांपूर्वी सोमंथळी गावातील ग्रामस्थांची सदर रस्ता खुला करण्यासाठीची मागणी शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आल्यानंतर ग्रामस्थांसह शिवसेनेच्यावतीने १५ ऑगस्ट पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.
दरम्यान प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ, पोलीस अधिकारी, ग्रामसेवक, सर्कल आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी रस्ता खुला करण्यासाठी सातत्याने चर्चा चालु होत्या. तहसीलदार समीर यादव यांनी सोमंथळी येथे घटनास्थळी जाऊन पुर्ण स्थळ पाहणी करुन त्यांच्या दालनात वादी व प्रतिवादी दोघांना एकत्र बोलावत सदर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. जेणेकरून दोन्ही गटांचे एकमत व्हावे. परंतु दोन्ही गटामध्ये एकमत होत नसल्याने मार्ग निघत नव्हता. सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचेकडेही पाठपुरावा सुरु होता. आठ दिवस झाले तरी सदर समस्या सोडवण्यात प्रशासनास यश मिळाले नाही. शेवटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची सदर प्रकरणात समस्या सोडवण्यासाठी भेटीची वेळ घेण्यात आली होती. असे शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
सोमवारी संध्याकाळी उशीरापर्यंत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या दालनात तहसीलदार समीर यादव यांचेसह शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, सर्कल कोंडके, तलाठी धुमाळ, ग्रामसेवक लंगुटे, सोमंथळी गावचे पोलीस पाटील सोडमिसे व दोन्ही गटाचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अडचणीची ठरत असलेली २ गुंठे जागा भुसंपादन प्रक्रिया राबवून सदर रस्ता कायमस्वरूपी सर्वांसाठी खुला करण्यासाठी सर्वांचे एकमत झाले. ग्रामपंचायतीने भुसंपादनाचा प्रस्ताव तयार करुन ठराव मंजूर करुन पंचायत समितीकडे द्यायचे असे एकमताने ठरले आहे. भुसंपादन प्रक्रियेमुळे २ गुंठे जागा मालकासही शासनाकडुन मोबदला म्हणुन भरपाई मिळणार आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नसुन भुसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांना वापरासाठी रस्ता खुला होणार आहे.
शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सोमंथळी येथील रस्त्याबाबतची समस्या एकमताने सोडवल्याबद्दल दोन्ही गटाचे मनःपूर्वक जाहीर आभार मानले. तसेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पोलीस प्रशासन, सर्व फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, तसेच आंदोलनास पाठींबा देणाऱ्या सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, सर्कल, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील या सर्वांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त केले व तहसीलदार समीर यादव यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार नवव्या दिवशी दि. २३ रोजी आंदोलन मागे घेण्यात आले.