पाटण : गत दोन महिन्यात ढगफुटी व अतिवृष्टीमुळे केरा विभागात प्रचंड नुकसान झाले होते. साखरी येथे ओढ्यानजिक राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. अनेकांची शेतीही वाहून जावून नुकसान झाले होते. घरांचे नुकसान झालेल्या रहिवाशांना पाटण रोटरी क्लबतर्फे संसारोपयोगी साहित्य देवून मदतीचा हात दिला.
16 जून व 22 जुलै रोजी झालेली ढगफुटी व अतिवृष्टीमुळे केरा विभागात प्रचंड नुकसान झाले होते. ओढ्या-नाल्यांना पूर येवून अनेकांची शेती उद्ध्वस्त झाली होती. अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजना वाहून गेल्या. विद्युत पंप, झाडे, ताली, शेतात पेरणी केलेली पिके वाहून गेली. यामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. अशावेळी पाटण रोटरी क्लब नेहमीच मदतीचा हात देत आली आहे. मंगळवारी त्यांनी साखरी येथील पूर बाधितांना मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी पाटण रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश रणदिवे, डॉ. विजयसिंह कासार, सरपंच अमर सावंत, अशोक भिसे, राजेश सावंत, दादासाहेब सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पाटण रोटरी क्लबचे अमरसिंह पाटणकर, बाळासाहेब देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार, डॉ. बाबासाहेब सावंत, डॉ. वीणा नांगरे, प्रदीप साळवेकर, जगदीश शेंडे, डॉ. प्रल्हाद चव्हाण व अन्य रोटरीक्लब सदस्यांनी सहकार्य केले
संसार उभे करून आरोग्याची घेतली काळजी
दरम्यान, या अगोदर पाटण तालुक्यात आंबेघर, झाकडे,गोजेगाव (बोन्द्री )मिरगाव, डिचोली, नवजा, पळासरी, गुंजाळी, किल्ले-मोरगिरी, नाटोशी, हुंबरळी, बाजे,ब मळे, कोळणे, पाथरपूंज, ढोकावळे याठिकाणी मदत पोहच केलीच आरोग्य तपासणी करून त्यांच्यावरर मोफत उपचार करून पुरेसा औषध पुरवठा देखील केला त्यामुळे डोंगर कापरातील जनता धन्यवाद देत आहे.