चेयरमन दिनकरराव घाडगे यांची माहिती
पाटण : पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक जलद सुविधा मिळाव्यात. त्यांच्या वेळेची बचत व्हावी तसेच इतर बँकांच्या तुलनेत पाटण अर्बन बॅंकेकडूनही एटीएमची सेवा सर्वसामान्य लोकांना मिळावी, अशी अपेक्षा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची होती. त्यानुसार त्यांच्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून बुधवार दि. 29 रोजी पाटण अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत एटीएम सेवेचा शुभारंभ माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यातील 200 कोटींच्या आतील ठेवी असणाऱ्या बँकांपैकी एटीएमची या सेवेचे उद्घाटन करण्याचा मान सर्वप्रथम पाटण अर्बन बॅंकेला मिळाला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि पाटण अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शाखेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, संचालक दिलीपराव मोटे, जयसिंग राजेमहाडीक, वंदना सावंत, कविता हिरवे, मुख्य कार्यकारी अधिकारी माधव कपिलेश्वर, व्यवस्थापक के.आर.शिंदे, रामचंद्र पानस्कर, सीए विठ्ठलराव जाधव आदी उपस्थित होते.
अध्यक्ष दिनकरराव घाडगे पुढे म्हणाले, पाटण अर्बन बॅंकेने गेल्या 25 वर्षात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांना आजपर्यंत उत्कृष्ठ सेवा दिली आहे. विविध सुविधांही पुरविल्याने ग्राहक माझी बँक म्हणून या बॅंकेकडे पाहत आहेत. सर्वसामान्य लोकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी विक्रमसिंह पाटणकर हे नेहमीच प्रयत्नशील असतात. पाटण अर्बन बँकेच्या मुख्य पाटण शाखेत ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एचडीएफसी बँकेबरोबर पाटण अर्बन बँकेशी टाईप करण्यात आले असल्याने आता ग्राहकांना पुणे, मुंबई तसेच एचडीएफसी बॅंकेच्या कोणत्याही शाखेच्या एटीएममधून विनामुल्य पैसे काढता येणार आहेत. तसेच इतर बॅंकेच्या एटीएममधून तीनवेळा विनामुल्य व्यवहार करता येणार आहेत. गुगल पे, पेटीएम, भीम, फोन पे या सुविधाही बँकेमार्फत दिल्या जाणार आहेत.
ग्रामीण भागातील को ऑपरेटिव्ह बँकेने जिल्ह्यात प्रथमच ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली असून याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होणार आहे. तसेच भविष्यात बँकेच्या इतर स्वमालकीच्या असलेल्या इमारतीतही एटीएम सेवा लवकर सुरू करण्यात येईल. बँकेमार्फत पाटण, सातारा व मल्हरापेठ येथील व्यापाऱ्यांना 32 पॉज मशिन व क्युआर कोडचेही वितरण करण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक देवाण- घेवाण अधिक सुलभपणे होणार असून त्यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचतही होणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोविड काळात आर्थिक गतीचक्र थांबली असताना या अडचणीच्या काळात देखील पाटण अर्बन बँकेने आपली सेवाभावी वृत्ती कायम ठेवून ग्राहकांच्या गरजा व अडचणी रिझर्व्ह बँकेच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत, सहकारी खात्याचे तंतोतंत पालन तसेच ग्राहकांना केंद्रबिंदू मानून दिलेल्या तत्पर सेवा, पारदर्शक कारभार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. ग्राहकांनीही बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उपमुख्यकार्यकारी अधिकारी माधव कपिलेश्वर व व्यवस्थापक के.आर.शिंदे यांनी केले आहे.